Sat, Nov 17, 2018 02:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › का कोसळला शेअर बाजार?

का कोसळला शेअर बाजार?

Published On: Feb 03 2018 2:18AM | Last Updated: Feb 03 2018 12:25AMसंदीप पाटील (करसल्लागार आणि शेअर बाजार अभ्यासक)
 

शेअर बाजार हा सेंटिमेंटस् म्हणजे भावनांवर हिंदोळे घेत असतो, असे म्हटले जाते. त्यामुळे एखाद्या छोट्या निर्णयाचेही बाजारावर मोठे परिणाम दिसून येतात. त्यामुळे  अर्थसंकल्पासारखे देशाच्या अर्थव्यवस्थेची दिशा ठरवणार्‍या घटकाचे बाजारावर परिणाम झाले नसते तरच नवल! त्यातच अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येपूर्वीपासूनच बाजाराशी निगडित एका महत्त्वाच्या विषयाची चर्चा सुरू होती आणि बाजाराशी संबंधित प्रत्येक घटकाचे त्याकडे लक्ष होते. ती गोष्ट म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स. शेअर बाजारातील दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर. हा कर लागू झाल्यास बाजारात मोठी पडझड होणार, असे संकेत मिळत होतेच. 

 लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्समुळे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेतील, अशी अटकळ आहे. 2014 च्या सुरुवातीपासून शेअर बाजारात 94 अब्ज डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली आहे, हे याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे. आता या गुंतवणूकदारांना कर द्यावा लागणार आहे. घसरणीचे मुख्य कारण एलटीसीजीटी असले तरी ते एकमेव नाही. अर्थसंकल्पात ठेवण्यात आलेले वित्तीय तुटीचे ध्येय, जीएसटीच्या महसुलात झालेली घट आणि मुख्य म्हणजे जागतिक शेअर बाजारांमध्ये झालेली घसरण हीदेखील कारणे ताज्या घसरणीमागे आहेत. येणार्‍या तीन-चार महिन्यांपर्यंत हे तीव्र चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता आहे. अशावेळी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला पाहिजे. तात्पुरता नफा डोळ्यासमोर ठेवून कोणत्याही समभागांची खरेदी करण्याचा पर्याय नुकसानदायक ठरू शकतो. आगामी काळात विमा, आयटी, कमोडिटी या समभागांचा पर्याय हितकारक ठरू शकतो. तसेच येणार्‍या काळात काही कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवून राहणेही फायद्याचे ठरेल. मुख्य म्हणजे शेअर बाजारात घसरण झाल्यामुळे घाबरून न जाता आणि आपले समभाग विक्रीचा निर्णय न घेता योग्य संधीची वाट पाहणे आवश्यक आहे.