Fri, May 24, 2019 21:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळ कधी सुटणार; आज, उद्या की आठवड्याने ? 

भुजबळ कधी सुटणार; आज, उद्या की आठवड्याने ? 

Published On: May 05 2018 3:55PM | Last Updated: May 05 2018 3:59PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला आहे. पण, ते नक्की बाहेर कधी येणार ? याबाबत ठोस माहिती मिळत नाही. भुजबळांना स्वादुपिंडाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर केइएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे उपचार पूर्ण होण्यास १ आठवड्याचा कालावधी लागू शकतो, असे म्हटले जात आहे. तर

विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या मते ते सोमवारी बाहेर येतील. अशा तर्क वितर्कांमुळे भुजबळांची सुटका नक्की कधी असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना पडला आहे. 

वाचा : भुजबळांचे 'केईएम'मधील फोटो तुम्ही पाहिले का?

अडीच वर्षांनंतर भुजबळांना जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाके आणि पेढे वाटून आनंद साजरा केला. पण, तेच कार्यकर्ते आता आपल्या नेत्याच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. पण, भुजबळ येवल्यात कधी परतणार याची खरी माहिती मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. कोण म्हणते त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने  डिस्चार्ज मिळण्यास किमान एक आठवडा लागणार आहे. तर कोण म्हणते २ दिवस लागतील. या चर्चांमुळे कार्यकर्त्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. 

आजच (५ मे) धनंजय मुंडे यांनी केईएम रूग्णालयात भुजबळांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास त्यांच्यात चर्चा झाली. ‘मी डॉक्टरांनाही भेटलो, डिस्चार्ज संदर्भात चर्चा केली ;दोन दिवस भुजबळ साहेब रुग्णालयातच राहणार असून सोमवारी ते बाहेर येतील, असे धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

भुजबळांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ‘भुजबळांना बाहेर येण्यास सोमवारचा दिवस उजाडेल. कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन कामकाज पाहता भुजबळ सोमवारी बाहेर येतील. शनिवारी आणि रविवारी कोर्ट बंद असल्यानेही भुजबळांच्या सुटकेला विलंब लागू शकतो,असे अजित पवार म्हणाले होते. 

गेल्या दोन वर्षाहून अधिक काळ तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची भुजबळ यांना काल हायकोर्टानं जामिन मंजूर केला. मात्र काल जामिनाची प्रत उशिरा मिळालानं त्यांची सुटका होऊ शकली नाही. आज भुजबळ यांच्या सुटकेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. केईएममधून त्यांना थेट घरी जाऊ देण्यात येईल की थांबवण्यात येईल याबाबत शंका उपस्थित केली जातेय.