Tue, Aug 20, 2019 04:12होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाणी..इतके महत्वाचे का?; येथे क्लिक करा व जाणून घ्या! 

पाण्याला जीवन का म्हणतात?; जाणून घ्या!

Published On: May 06 2018 1:49PM | Last Updated: May 06 2018 1:49PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

पाणी…पृथ्वीवरच्या सजीवांचा जगण्याचा मुख्य आधार.. प्रत्येक सजीवाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण घटक होय. पाण्याशिवाय जगण्याचा कोणी विचारही करू शकत नाही. शास्त्रज्ञ देखील नव्या ग्रहाचा शोध लावल्यानंतर तेथे पाणी आहे का हे प्रथम पाहतात. अशा या H2Oमध्ये (पाण्यात) आहे तरी काय आणि जगण्यासाठी अन्नापेक्षाही ते का व किती महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊयात... 

पृथ्वी आणि मानवी शरीरातील सर्वात मोठा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीचा ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे. हे तर तुम्हाला माहीतीच आहे. पण, पृथ्वीवर तब्बल 32 कोटी 60 लाख अब्ज गॅलन पाणी आहे याची माहिती फार कमी लोकांना असेल. मानवी शरीराचा विचार करता एका प्रौढ पुरुषाच्या शरीरात ६५ टक्के तर महिलेच्या ५२ टक्के पाणी असते. प्रौढ माणसांच्या शरीरात नेहमी ३५ ते ४० लीटर पाणी असते. 

मानावासाठी पाणी किती गरजेचे? 

पाण्याने फक्त मानवी शरीराची बाह्य स्वच्छता होत नाही तर अंतर्गत स्वच्छतेसाठीही पाणी तितकच गरजेचे आहे. मानवाच्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम पाण्याद्वारेच होते. 

मानवी शरीराचा प्रत्येक अवयव आणि स्नायुंमध्ये पाणी असते. शरीरातील सर्वात मजबूत समजल्या जाणाऱ्या  हाडांमध्येही २२ टक्के पाणी असते. आपल्या दातांमध्ये १० टक्के, त्वचेमध्ये २० टक्के, मेंदूमध्ये ७४.५ टक्के, स्नायूंमध्ये ७५.६ टक्के आणि मानवची रक्तामध्ये ८३ टक्के पाणी असते. 

मानव अन्नाशिवाय १५ दिवस जिवंत राहू शकतो. पण, पाणी न मिळाल्यास पाचव्याच दिवशी त्याचा मृत्यू होऊ शकतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. 

शरीरात १ टक्के जरी पाणी कमी झाले तरी तुम्हाला तहान लागते. हेच प्रमाण जर ५ टक्क्यांवर गेले तर तुमच्या शरीरातील नसा ताणल्या जातात आणि तुम्हाला अशक्तपणा वाटू लागतो. 

शरीरातील पाण्याचे हेच प्रमाण जेव्हा १० टक्क्यांवर पोहोचते तेव्हा तुम्हाला समोरील गोष्टी अंधुक दिसायला लागतात आणि तुम्ही बेशुद्‌ध पडता. शरीरात पाणी कमी असण्याचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यास तुमचा मृत्यूही होऊ शकतो. शरीरासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे म्हणूनच सतत तहान लागण्याचे हे तंत्र विकसीत झाल्याचे शास्त्रज्ञ सांगतात.

का गरजेचे आहे पाणी ?

शरीरातील पावणे तीन टक्के भाग हा पाणी आणि द्रव्य पदार्थाने बनलेला असतो. मानवी शरीराची जीनवदायीनी समजल्या जाणाऱ्या रक्तातही ८३ टक्के पाणी असते. रक्त मानवी शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, हिमोग्लोबिन, ऑक्सिजन इत्यादी महत्त्वाचे घटक पोहोचवत असते. 

मूत्र आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा द्रव्य घटक आहे. शरीरातील अपायकारक घटक मूत्रावाटे बाहेर पडतात. शरीरात पाणी कमी असेल तर शरीरातील विषारी घटक बाहेर पडणार नाहीत. असे न झाल्यास त्वचा कोरडी पडणे, बद्धकोष्ठता, डोकेदुखी यांसारखे आजार होऊ शकतात. पाणी कमी असल्याने किडनीशी संबंधित आजारही होऊ शकतात. 

पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम आणि पोटॅशियमसारखे घटक असतात. डीहायड्रेशनपासून बचावासाठी या तिन्ही घटकांचा समतोल राखणे गरजेचे असते. रक्ताचा पी.एच स्तर टिकवून ठेवणे, रक्तवाहिण्या, मेंदू, शरीरातील इतर अवयवांचे काम सुरळीत सुरू रहावे असे वाटत असेल तर या घटकांचा समतोल राखणे अत्यंत आवश्यक आहे. 

मानवी शरीरातील डोळे, तोंड आणि पचनसंस्था या नाजूक भागांनाही पाण्याची आवश्यकता असते. अन्न पचवण्यासाठी तोंडात निर्माण होणारी लाळही अत्यंत महत्वाची ठरते. लाळच निर्माण होत नसेल तर अन्न चावण्याच्या आणि ते पोटात जाण्याच्या प्रक्रियेत त्रास होऊ शकतो. त्यामुळे अपचनाचा त्रास होऊ शकतो. 

शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी ‘व्हिटॅमिन डी’ आणि ‘कॅल्शिअम’सोबत पाण्याचीही गरज असते. शरीरातील प्रत्येक जॉइंट्सच्या हालचाली सहजरित्या व्हाव्यात यासाठी पाण्याची गरज आहे. शरीरातील पाणी कमी झाल्याने हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात. आर्थाइटिसच्या गाठीही होण्याचा धोका असतो. 

शरीरातील तापमान संतुलित राखण्याचे कामही पाणी करते. एका सामान्य शरीराचे तापमान ३५ डिग्री सेल्सियस किंवा ९८.६ फारेनहाइट असते. म्हणूनच जेव्हा आपण कडक उन्हात जातो तेव्हा आपल्या शरीरातून घाम येऊ लागतो. पाणी मेंदू होणाऱ्या आणि स्पाइनल कॉडच्या झटक्यांपासून बचाव करते.  

कोणाला किती पाणी प्यायला हवे?

तापमानाचा समतोल राखून शरीरात जावे असे वाटत असेल तर पाणी एक-एक घोट घेऊन पिले पाहिजे. यामुळेच तोंडाला ग्लास लावून पाणी पिणे चांगले मानले जाते. 

काही लोक मान उंचावून पाणी पितात ही सवय आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे मानले जाते. अशा पद्धतीने पाणी पिल्याने अन्ननलिकेत हवेची रिकामी पोकळी निर्माण होते आणि पचनाशी संबंधित आजार उद्भवतात.

चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्याने ॲसिडीटी, आंबट ढेकर, हाडांमधील दुखणे, गुढघ्यातील दुखणे असे आजार होऊ शकतात. 

काही लोक २ ते ३ तास पाणी पित नाहीत आणि नंतर एकाच वेळी अधिक पाणी पितात. ही सवय देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा  प्रभाव किडनी आणि हृदयावर पडतो. प्रत्येक तासाला किमान एक ग्लास पाणी प्यावे. 

जेवणाच्या अर्धातास आधी व जेवण झाल्यावर एका तासानंतर पाणी प्यावे. जेवणाआधी पाणी पिल्याने तुमची पचनसंस्था बिघडू शकते. तर जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने तुमचे पोट फुगू शकते. तुमचे वजनही वाढू शकते आणि बद्धकोष्टताही होऊ सकते. 

जास्त पाणी पिल्यास उच्च रक्तदाब, ताप, बद्धकोष्टता, पोटातील जळजळ, मुत्रावाटेत होणारी जळजळ, युरेन इन्फेक्शन असे आजार कमी होऊ शकतात.

गरम चहा किंवा कॉफी पिल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. खरबूज किंवा काकडी खाल्यानंतर तसेच उन्हातून आल्यावर लगेच पाणी पिऊ नये. 

दिवसातून कमीत कमी  ८ ग्लास पाणी प्यावे. तुमचे वय, शरीराची गती, आजूबाजूचा परिसर आणि पर्यावरण यावर तुम्ही किती पाणी प्यावे ही गोष्ट अवलंबून आहे. किडनीची कोणतीही तक्रार नसलेल्या

व्यक्तीने त्याच्या वजनाच्या तुलनेत एका किलो मागे ३० मिलीलीटर पाणी प्यावे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. 

पाणी न पिल्याने होणारे आजार

लवकर थकने, अशक्तपाणा, ऊर्जेची कमतरता, अवेळी वयोवृद्ध होणे, वजन वाढणे, उच्च आणि कमी रक्तदाब, कोलेस्ट्रॉल वाढणे, बद्धकोष्ठता, पचनाशी संबंधित आजार, श्वसनाशी संबंधित आजार, एक्जिमा, सिस्टाइटिस आणि शरीरात गाठी होणे

पृथ्वीवर पाणी किती आहे ? 

पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याचे व्यापलेला आहे. यामध्ये ९७ खारे पाणी आहे. पृथ्वीवरील गोड पाणी पर्वतांवरील बर्फात, नद्यांमध्ये आणि भूमीगत स्त्रोतांमध्ये आढळते. जगात असलेल्या पाण्यापैकी  ७० टक्के गोड पाणी हे अंटार्क्टिका आणि ग्रीनलँड येथे बर्फ स्वरुपात आहे. बाकी ३० टक्के पाणी तलाव, नदी आणि झऱ्यांमध्ये सापडते. जगातील सर्वच गोड्या पाण्याचा १/५ टक्के साठा अमेरिका आणि कॅनडातील ग्रेट लेक्समध्ये सापडतो. रशियामधल्या बॅकाल तलावातही गोड्या पाण्याचा १/५ साठा सापडतो.