Tue, Feb 19, 2019 10:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळेच्या सभागृहातील लग्न गरिबांना महागात!

शाळेच्या सभागृहातील लग्न गरिबांना महागात!

Published On: Feb 04 2018 2:16AM | Last Updated: Feb 04 2018 2:14AMमुंबई : राजेश सावंत 

लग्नसमारंभासाठी पालिका शाळांतील सभागृह गरिबांनाच उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. पण या धोरणाला पालिकेच्या शिक्षण विभागाकडून हरताळ फासण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पिवळे व केसरी रेशनकार्ड असलेल्या मुंबईतील गरिबांना पालिकेच्या 14 शाळांमधील सभागृहाचे दुप्पट भाडे भरावे लागत आहे. पालिकेकडून होणार्‍या या लुटमारीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. 

पालिका शाळांमधील सभागृह लग्नसमारंभ व अन्य कार्यक्रमासाठी केवळ पिवळे व केसरी रेशन धारक व महापालिकेचे क व ड श्रेणीतील कर्मचार्‍यांना दिले जाते. तसे धोरणही 2013 मध्ये निश्‍चित करण्यात आले होते. पण शाळेच्या सभागृहाला स्थानिक जनतेकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचे कारण पुढे करत, पालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील 14 शाळांचे भाडे दुप्पट केले आहे. या निर्णयामुळे 1 हजार चौरस फुटापेक्षा कमी असलेल्या सभागृहासाठी 7 हजार रुपयाऐवजी 14 हजार रुपये तर 1 हजार चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रपळ असलेल्या सभागृहाचे भाडे 10 हजार रुपयेऐवजी 20 हजार रुपये मोजावे लागत आहेत. यात विद्युत भाडे, पाणी आकार, साफसफाई शुल्क, अनामत रक्कम व 12.36 टक्के सेवा शुल्क स्वतंत्र आहे. त्यामुळे सभागृहाचे भाडे  30 हजार रुपये ते 37 हजार रुपयाच्या घरात जात आहे. त्यामुळे वार्षिक 50 हजार ते 1 लाख उत्पन्न असणार्‍या गरिबांना पालिका शाळेतही लग्न करणे आवाक्याबाहेर गेले आहे. 

पालिका शिक्षण विभागाच्या या लुटमारीची पोलखोल भाजपाच्या शिक्षण समिती सदस्या प्रा. आरती पुगावकर यांनी केली आहे. महिना 5 ते 10 हजार रुपये कमवणारा गरिबाने लग्नच करू नये का ? पालिकेने ज्या गरिबांसाठी शालेची सभागृह उपलब्ध करून दिली, त्याच गरिबांची दुसरीकडे होणारी लुटमार भाजपा कधीच सहन करणार नाही. गरिबांची होणारी लूट पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला दिसत नाही का ? असा सवालही पुगावकर यांनी केला. ही लुटमार थांबली नाही तर, भाजपा रस्त्यावर उतरेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.