होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लग्न करा केवळ १०१ रुपयात!

लग्न करा केवळ १०१ रुपयात!

Published On: Apr 12 2018 10:11AM | Last Updated: Apr 12 2018 10:11AMखानिवडे : वार्ताहर

आई श्री चंडिकादेवी जूचंद्र न्यासाच्या वतीने 19 एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यात इच्छुक वधू, वरांना केवळ 101 रूपये या नाममात्र शुल्कामध्ये विवाहबद्ध होता येणार आहे.

एकीकडे सामाजिक चालीरीती व परंपरा मानून खोट्या प्रतिष्ठेसाठी कर्जबाजारी होवून सर्वसामान्य नागरिकांना विवाहाच्या जोखडात अडकावे लागते. अश्या विवाह सोहळ्यामुळे घरचा जमीनजुमला, दागदागिने आणि बचत यांचा वापर करून अनेक कुटुंबे कफल्लक बनल्याची उदाहरणे घडलेली पाहावयास मिळतात. परंतु विवाह सोहळ्यातील आत्यंतिक खर्चिक बाबी आताच्या महागाईच्या काळात परवडण्यासारख्या राहिलेल्या नाहीत. हेच सकल समाजमनावर बिंबवण्यासाठी एक आशेचा किरण जूचंद्र येथील श्री चंडिकादेवी न्यासातर्फे निर्माण करण्यात आला आहे.

केवळ 101 रुपयांत 12 व्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन 19 एप्रिल रोजी करण्यात आले आहे. श्री चंडिकादेवी न्यास जूचंद्र, सहयोगी संस्था आणि इतर सेवाभावी मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या देवी श्री चंडिका मंदिराच्या पायथ्याशी उभारलेल्या भव्य मंडपात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा होणार आहे. यावेळी वर्‍हाडी मंडळींची भोजनाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रतिवर्षी प्रमाणे वधू, वरांना भेट वस्तू देण्यात येणार आहेत.

सोहळ्यात 68 जोडप्यांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या मंगल विधींना सकाळपासून सुरुवात होणार आहे. सकाळी 10 वाजता वरात काढण्यात येणार आहे. 12 वाजता लग्न मुहूर्त तर 12.30 मिनिटांनी कन्यादान होणार आहे. 12 . 45 वाजता सत्कार सोहळा व दुपारी एक वाजल्यापासून भोजन समारंभ होणार आहे.