Sun, May 26, 2019 13:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता सेनेने युतीसाठी पुढे यावे : मुख्यमंत्री

आता सेनेने युतीसाठी पुढे यावे : मुख्यमंत्री

Published On: May 31 2018 7:30PM | Last Updated: Jun 01 2018 1:37AMमुंबई: खास प्रतिनिधी

शिवसेनेशी युतीसाठी चर्चा करण्यास भाजपानेच नेहमी पुढाकार घेतला आहे, मात्र युती कधीच एकतर्फी असू शकत नाही, त्यामुळे आता युती ठेवायची असेल, तर शिवसेनेलाही दोन पावले पुढे यावे लागेल, असे सुनावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती टिकवण्याची जबाबदारी शिवसेनेवरच ढकलली आहे. मात्र, पालघरमध्ये प्रचारात आलेला कडवटपणा भाजपाकडून संपला असल्याचे सांगत सबुरीची भूमिकादेखील घेतली आहे. 

पालघरची निवडणूक ज्याप्रकारे लढवली गेली, ते टाळता आले असते. या निवडणुकीमुळे एकमेकांविरुद्ध कडवटपणा निर्माण झाला. एकाच विचारसरणीचे पक्ष एकमेकांशी लढल्यामुळे नुकसान होते. वेगळे लढल्याने शिवसेनेचेही वैयक्तिक नुकसान होत आहे.सत्तेत असलेल्या दोन पक्षांनी एकमेकांविरुद्ध लढावे का, याचा विचार होणे गरजेचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी निकालानंत्र प्रसारमाध्यमांशी बोलताना घेतली. 

भाजपाने शिवसेनेला नेहमीच सन्मानाची वागणूक दिली असून बाळासाहेब ठाकरे यांना युतीचे शिल्पकार म्हणून भाजपाचे प्रत्येक कार्यकर्ते अजूनही विसरलेले नाहीत, मात्र, युती ही एकतर्फी असू शकत नाही, असेही फडणवीस यांनी बजावले. स्वबळावर लढण्याची भाषा  सध्या शिवसेना करीत असली, तरी राजकारणात परिस्थितीजन्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीसंदर्भात योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

भाजपाविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याची हाक उध्दव ठाकरे यांनी दिली असल्याकडे लक्ष वेधले असता,ज्यांच्याविरोधात वैचारिक लढा आम्ही एकत्रितरित्या दिला, त्यांच्यासोबत शिवसेना जाईल, असे वाटत नसल्याचे फडणवीस म्हणाले.  

इव्हीएममधील बिघाडाचा तोटा भाजपालाच!

मतदान यंत्रांमध्ये (इव्हीएम) मोठ्याप्रमाणावर झालेल्या बिघाडाची निवडणूक आयोगाने नोंद घेणे आवश्यक असून या बिघाडाचा मोठा फटका भाजपालाही बसला आहे. आमचा सुशिक्षित नोकरदार मतदार सकाळी पहिल्यांदा मतदानासाठी गेला, मात्र ईव्हीएम बंद असल्याने तो कामावर निघून गेला आणि परत आलाच नाही, त्यामुळे आमचेच नुकसान झाले आहे. मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याची तक्रार आम्हीच केली होती, आणि जेथे असे झाले, तेथील मतदानाच्या वेळेत वाढ करण्याची मागणीदेखील भाजपाने केली होती, मात्र आयोगाने दुर्लक्ष केलेे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

मतदानाची यंत्रे आम्हीच तयार केली असल्याच्या थाटात काहीजण भाजपाविरोधात प्रचार करीत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना शिवसेनेने जे आरोप केले आहेत, त्यांची उत्तरे निवडणूक आयोगानेच द्यायची आहेत, असेही ते म्हणाले. ईव्हीएममध्ये गडबड असती तर आम्ही देशातल्या सगळ्या निवडणुका जिंकल्या असत्या. कर्नाटकात 104 वर कशाला थांबलो असतो. पालघर जिंकलो आणि भंडारा-गोंदिया हरलो असे कशाला केले असते? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला.