Thu, May 28, 2020 12:47होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत पाणीपट्टी अडीच टक्के वाढणार !

मुंबईत पाणीपट्टी अडीच टक्के वाढणार !

Published On: Jun 12 2019 1:19AM | Last Updated: Jun 12 2019 12:56AM
मुंबई : राजेश सावंत 

आस्थापना खर्चासह राज्य सरकारने पाण्याच्या दरात केलेल्या वाढीमुळे पालिकेच्या जलअभियंता विभागाने पाणीपट्टीत अडीच टक्केपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी स्थायी समितीत याबाबत निवेदन करून, पाणीपट्टीवाढीची अंमलबजावणी 16 जूनपासून करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे घरगुती पाणीदरात सरासरी 10 ते 15 पैसे तर व्यावसायिक पाणीदरात 1 ते 4 रुपयापर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च (कर्मचार्‍यांचा पगार व अन्य भत्ते), प्रशासकीय खर्च, प्रचालन व परिरक्षण खर्च, विद्युत खर्च व शासनाच्या धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या एकत्रिक खर्चाचा आढावा घेऊन, दरवर्षी पाणीपट्टी वाढ करायची की नाही, याचा निर्णय घेतला जातो. प्रतिवर्षी 8 टक्केपर्यंत वाढ करण्याचा अधिकार स्थायी समितीने पालिका प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार 2018-19 या आर्थिक वर्षात झालेल्या खर्चाचा अभ्यास करून, पाणीपट्टी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आल्यामुळे विजेचा खर्च 2017-18 च्या तुलनेत कमी झाला आहे. प्रशासकीय खर्चातही कपात झाली आहे. पण या आर्थिक वर्षात आस्थापना खर्चासह शासनाच्या धरणातून घेण्यात येणार्‍या पाणीपट्टीत काहीप्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हा खर्च भरून काढण्यासाठी जलअभियंता विभागाने अडिच टक्केपर्यंत

पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या पाणीपट्टी वाढीच सविस्तर माहिती बुधवारी स्थायी समितीत जलअभियंता विभागाकडून सादर करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे 16 जूनपासून मुंबईकरांना पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.