Mon, Mar 25, 2019 17:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोरिवलीत जलवाहिनी फुटली!

बोरिवलीत जलवाहिनी फुटली!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी 

बोरिवली पश्‍चिमेत चिकुवाडीच्या आर. एम. भट्ट रोड बीबीसी सेंटरजवळ मोठी जलवाहिनी फुटली. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. ही जलवाहिनी फुटली तेव्हा स्फोट झाल्याचा मोठा आवाज झाला. यावेळेस स्थानिकांना काही वेळ नेमके काय झाले ते समजलेच नाही. त्यामुळे स्थानिकांची घाबरुन पळापळ सुरू झाली. स्फोट झाला अशा भीतीने आरडाओरडा करत धावपळ झाली, मात्र काही वेळातच मोठी जलवाहिनी फुटल्याने हा आवाज झाल्याचे लोकांना समजले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र, या घटनेमध्ये आसपासच्या दहा ते बारा गाड्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या आवाजामुळे आसपासच्या इमारतींच्या काचांना देखील यामुळे तडे गेले.

जलवाहिनी फुटली तेव्हा पाण्याचा दबाव वाढून जवळच असलेली एक भिंत कोसळली. तसेच या रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या रिक्षा, टेम्पो, कार आशा सुमारे दहा ते बारा वाहने एकमेकांवर आदळून त्यांचेही नुकसान झाले. यामुळे पेव्हर ब्लॉक उखडले गेले. तसेच त्याच्या जवळ असलेली झाडे देखील उन्मळून खाली पडली. साडेअकराच्या सुमारास याबाबत महापालिका नियंत्रण कक्षाला कळवण्यात आले. त्यानुसार पोलीस, आर मध्यच्या जलविभागाचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. पाणी इतक्या वेगाने बाहेर येत होते, की त्यामुळे आसपासचा रस्ता खचतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. 24 तास सतत पालिका कर्मचारी पाण्याची ही गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. त्यातच हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाल्याने कामात काही प्रमाणात अडथळा येत होता. त्यामुळे गर्दीला हटवण्याचे कामही त्यांना करावे लागत होते. अखेर दुसर्‍या दिवशी दुपारी ही गळती रोखण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळाले. मात्र, यात हजारो लीटर पाणी वाहून गेले.


  •