Tue, Sep 17, 2019 22:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नैसर्गिक बावखळीवर अतिक्रमण; पर्यावरणप्रेमी कुटुंबातीलच सदस्याची पोलिसात तक्रार

नैसर्गिक बावखळीवर अतिक्रमण; पोलिसात तक्रार

Published On: May 25 2019 6:11PM | Last Updated: May 25 2019 6:11PM
विरार : प्रतिनिधी 

विरार पश्चिमेकडे वसईची नैसर्गिक ओळख असलेली बावखळ चक्क भरणी टाकून बुजवल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचसोबत येथे झाडांची कत्तलही करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी कुटुंबातील ऑल्विन डिसिल्व्हा या पर्यावरणप्रेमी तरुणाने हरकत घेत बावखल बुजवणाऱ्या अन्य सदस्यांवर कारवाईची मागणी केली आहे. 

विरार पश्चिम आगाशी शिर्लेवाडी येथील सर्वे क्र. ५९/१ या जागेवर वडिलोपार्जित जूनी साडे चार गुंठे जागेत बावखल होती. पूर्वी या बावखलीच्या पाण्याचा वापर सिंचन पद्धतीने शेतीसाठी केला जात होता. या बावखलीवर एकूण ७ ते ८ जणांचा कौटूंबिक मालकी हक्क आहे. त्यातील एक ऑल्विन डिसिल्वा यांचे वडील आहेत. ऑल्विन हे कामानिमित्त सारखे बाहेर जात असे. अशात त्याच्या कुटुंबीयांनी ऑल्विन यांना बावखलीबाबत कोणतीही विचारपूस किंवा बतावणी न करता सदर बावखल भरणी करून रातोरात बुजवले तसेच त्याजागी असलेल्या मोठ्या वृक्षांचीही तोड करून त्याजागी अतिक्रमण केल्याची माहिती तक्रारदार यांनी दिली. बावखल सारखे नैसर्गिक पाण्याचे स्रोत अशा प्रकारे नष्ट करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमी असलेल्या ओल्व्हीनने आपल्या कुटुंबीयांविरोधात या प्रकारची अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. 

वसई-विरार परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. या शहरातील लोकांची तहान भागवायची तर प्रत्येक वेळेस तुम्हही पालघर, डहाणूमध्ये धरणे बांधून तेथील आदिवासी लोकांना त्रास देणार का? धरणाचे पाणी वेगळ्या लोकांसाठी, त्रास वेगळ्यांना असं का? त्यापेक्षा आपण आपले आहे ते नैसर्गिक स्रोत, तळी, पाणवठे टिकवले तर भविष्यात लागणाऱ्या  पाण्याचीही आपण तरतूद करून ठेवू शकतो! असे मत बावखल प्रेमी व्यक्त करत आहेत. 

काय आहे बावखळ? 

पाण्याचा साठा करण्यासाठी खड्डा बनवलेला असतो, त्यास वसईतल्या बोलीभाषेत बावखळ किंवा बावखल असे म्हणतात. बाव म्हणजेच विहीर. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोडय़ा पाण्याच्या साठय़ासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. पूर्वी रहाट बसवून वाडी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी तसेच पाणी पिण्यासाठी देखील याचा वर्षभर वापर केला जात असे. उत्तर कोकणातील काही भागात आजही याचा वापर होतो. बावखलीमूळे जमिनीत ओलसरपणा राहतो. त्यामुळे आजूबाजूच्या विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहते.

सदर प्रकरणात बावखल भरणी करून बुजविण्यात आलेली आहे, या प्रकरणाची चौकशी करून लवकरच दोषींवर कारवाई करण्यात येईल.

 -आप्पासाहेब लेंगरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अर्नाळा सागरी पोलिस ठाणे.