Tue, Jul 16, 2019 09:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रिय मुंबई, ओळखलंस का? तुझाच...(Viral Post)

प्रिय मुंबई, ओळखलंस का? तुझाच...(Viral Post)

Published On: Jul 04 2018 12:01PM | Last Updated: Jul 04 2018 12:19PMमुंबई : पुढारी ऑनलाईन

मुंबई महाराष्ट्राची राजधानी देशाची आर्थिक राजधानी या शहरात काहीही घडलं तरी मुंबई थांबत नाही. कितीही मोठी दुर्घटना घडली तरी प्रत्येकजण आपआपल्या कामात पुन्हा कार्यरत होतो. मात्र, सध्या मुंबईकरांचे जीवन किड्यामुंग्यांप्रमाणे  झालं आहे. काल अंधेरीत पुल कोसळला. सुदैवाने त्यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. पावसाने तर मुंबईकरांचे हाल सुरु झाले आहेत. इथल्या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत.

अंधेरी पुल कोसळण्यासारख्या घटना यापूर्वी मुंबईने  पाहिल्या आहेत. आठवडाभरापूर्वीच चार्टर्ड विमान कोसळले होते. तेव्हा अनेक प्रश्न समोर आले होते. जर भरवस्तीस विमान कोसळले असते तर त्याची कल्पनाही करता येणार नाही. त्या अगोदर एल्फिस्टन चेंगराचेंगरी, २६/११ चा दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट यांनी तर देशालाच हादरवून सोडले होते. मुंबई सुरक्षित आहे का? असा प्रश्न प्रत्येकजण विचारत होता. इतक्या संकटांचा सामना करत खचून न जाता मुंबई आणि मुंबईकर पुन्हा नव्याने कामाला लागतात. त्यांच्यातल्या या स्पिरीटचे कौतुकही केले जाते. मात्र या स्पिरीटच्या नावावर मुलभूत सोयी-सुविधांकडे सरकारकडून दुर्लक्ष तर होत नाही ना असेही प्रश्न पडतात. आपली स्वप्ने पुर्ण करण्यासाठी अनेकजण मुंबईत येतात. स्वप्नांना पाठबळ मिळालं की भरारी घेतात. एका नागरिकाला भरभरुन देणाऱ्या मुंबईवर प्रेमही तितकेच करतात. मात्र मुंबईची सध्याची अवस्था पाहून हे प्रेम कमी झालं की काय असेच दिसून येते. यावरच एका माजी मुंबईकराचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रिय मुंबई,

हाय, मला ओळखलंस का? मी तुझा बॉयफ्रेन्ड.. सॉरी एक्स बॉयफ्रेन्ड. हा म्हणजे आपला ब्रेकअप होऊन आता बराच वेळ झाला. त्यानंतर तुझे अनेक प्रियकर होऊन गेले असतील, किंवा अजूनही असतील. पण कालपरवापर्यंत मला तुझ्याबद्दल जे प्रिय वालं फिलींग होतं, ते आता अजिबात राहिलेलं नाही. यापुढे तुला प्रिय म्हणावं का, हाच खरा प्रश्न आहे. गेल्या काही वर्षांत तू फार बदललीस. हिरोईनने एखाद्या गाण्यात पटापट चार ड्रेस बदलावेत, तसा हा बदल आहे. आता हिरोईनने एकाच गाण्यात चारवेळा कपडे का बददले, हा प्रश्न जसा कुणी विचारला नव्हता, तसंच तुलाही कुणी तू का बदललीस म्हणून विचारलं नाही, आणि विचारणारदेखील नाही. एनीवे.

आज अंधेरीला पूल पडला. अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कधी ना कधी पडणारच होता, हे माहितच होतं लोकांना. उद्याचं मरण आजवर आलं, एवढंच. तुला माहितीये का, लोकांना कळलंय, की तू खचत चाललीएस. वडाळ्यात खचलीस. त्यानंतर काल परवाच काळाचौकीलाही खचलीस. डिप्रेशनमध्ये असं सगळं होतंच. स्वाभाविकच आहे. काही गोष्टी नैसर्गिकच असतात, त्याला तू काय किंवा मी काय, कुणीच काही करु शकत नाही. नैराश्यात फक्त मोटीवेटींग आणि इन्स्पिरेशल कोट वाचून उभारी मिळत नाही हेच खरं. प्लास्टिकबंदीनं आनंदी झालेला तुझा चेहरा पाहिला होता, पण हे हसू फार काळ तुझ्या चेहऱ्यावर टिकणार नाही, याची पुसटशी कल्पना होतीच. झालंही तेच.

 आपली प्रियसी खचतेय, हे प्रियकराला कळत असतं. मलाही कळतंय गं… पण करणार काय? माझ्यापेक्षा बाकीचे सगळे खूप प्रेम करतात गं तुझ्यावर. तू त्यांना भरभरून देतेस. आपलंसं करुन टाकतेस. कोण कुठून आलाय, कसाय, याचा कसलाही विचार न करता तू त्यांना सर्वस्व देऊन मोकळी होतेस. निस्वार्थ प्रेम केलं की काय होतं, हे आज तू दाखवून दिलंस. उद्ध्वस्त होण्यासाठी स्वतःची राखच झाली पाहिजे, असं काही गरजेचं नसतं गं. कधी कधी आपण स्वतःला इतकं पोखरुन घेतो, की उद्ध्वस्त होण्याची वेगळी गरजच उरत नाही. तुझंही तेच होतंय, किंबहुना झालंय.

 खरं सांगू का, तुझ्यासोबत असलेलं नातं इतके दिवस केवळ पैशांसाठी टिकून होतं.. आता ती गरज संपली म्हणून आपलं नातंही संपलं. खरंतर म्हणूनच तूला आता आय लव्ह यू म्हणायचीही गिल्ट वाटतेय.. 

 तुला आठवतंय का? तुझा तो अथांग समुद्र, जुन्या वास्तू, तुझं स्पिरीट यावर मी कितीक कविता, गझला आणि गुणगान गायले असतील. पण आता जेव्हा मागे वळून पाहतो, तेव्हा हे सगळं मीच तुझ्यासाठी लिहीलं होतं का, अशी माझीच मला शंका येते. तू आता खूप बदलीएस. आणि एकदा का बदल खुपला, की विश्वास संपतोच. माझाही तुझ्यावरचा विश्वास उडालेलाय. तू आता कोणत्याही क्षणी घात करु शकतेस. मला माहितीये हे खूपच रूडली बोलणं आहे. पण हो, तुला हे ऐकावंच लागेल. 

तू कोणत्याही क्षणी मला मॅनहोलमध्ये पाडून मारु शकतेस. रस्त्यावरुन जाताना विमान माझ्या अंगावर पाडायलाही तू कमी करणार नाहीस. किंवा मग चेंगराचेंगरीमध्ये गुदमरुन माझा श्वास कायमचा कसा बंद पाडायचा, हे ही तुला कळलेलंच आहे. झाडाखाली उभा राहिलो सावलीत, तर फांदी पाडून मारायलाही तू मागेपुढे पाहणार नाहीस. तू  कोणत्याही थराला जाऊ शकतेस हे मला कळून चुकलंय. खरंच आता तुझ्यावर कुणी प्रेम करावं का, हा ही प्रश्न आहेच. मला माहितीये तुला हे ऐकून वाईट वाटेल, दुःख होईल. पण यापुढे मला तरी तुझ्यावर विश्वास ठेवणं कठीणए.

मला मान्य आहे की चूक फक्त तुझ्या एकटीचीच नाहीये. तूला पूर्णपणे दोष देऊन मी माझ्या चुकांकडे कानाडोळा करतोय, असं अजिबात नाही. मी तुझ्यावर प्रेम केलं ही देखील माझी चूकच होती, हे देखील आता स्वीकारायलाच हवं. एका स्वार्थासाठी फक्त तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे, हे तू अजूनही का ओळखू शकली नाहीस? मी ही त्याच स्वार्थी लोकांपैकी एक होतो, हे मला आज कळतंय. चांगल्या सवयींची तारिफ करताना तुझ्या वाईट सवई वेळीच मी थांबवल्या नाहीत, हे चुकलंच माझं. तुझं चुकतंय, हे तुला सांगितलं नाही, हा माझा गुन्हाच होता. ज्या गुन्ह्याची माफी मागणही आता माझ्या हातात नाही. तरीही जमलं तर मला माफ कर. रियली सॉरी.

तुझी काळजी तू घेशीलच. खात्री आहे. तुझ्या ढसा-ढसा रडण्यानं सखल भाग गलबलून जातात. चारचाकी वाहनांना तू लगेच कवेत घेतेस. मेट्रो काय किंवा मोनो काय, जागा मिळेल तिथून तुझ्यावर उभा आडवा पाशवी बलात्कार केला जातो, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहतोय. पण करणार काय? रोजची शिफ्ट आणि आठवड्याचा विक ऑफ या सगळ्यांत तूला वेळ देणं राहूनच गेलं. आणि शेवटी नातं टिकवायचं असेल, तर वेळ द्यावा लागतो, असं तू जे म्हणायचीस, ते अखेरपर्यंत मला जमलंच नाही गं.

तुला आठवत असेल, एल्फिन्स्टनमधल्या चेंगराचेंगरीला वर्षही झालं नाहीये. २९ ऑगस्टच्या पावसाचीही वर्षपूर्ती अजून व्हायचीए. जुलै आता कुठे सुरु झालाय. २६ तारीख बघता-बघता जवळ येईल. ११ जुलैला तुझी काढण्यात आलेली छेड मी अजूनही विसरलेलो नाहीये. शेतकऱ्यांनी संप पुकारला, तेव्हाही तू ठप्प झालीस. रेल्वे एप्रेन्टिसवाल्यांनी तुला धारेवर धरलं, तेव्हाही तू कोलमडलीस. आठवड्याभरापूर्वी मुसळधार पाऊस झाला, तेव्हाही तू रडकुंडीला आली होतीस. या सगळ्यांमध्ये तू गळा काढून रडलीस. पण तुझे डोळे पुसायला कुणीच आलं नाही. मी ही नाही. 

 पण ऐक. हे आणि यासारखं बरंच काही भविष्यात अनेक वेळा होत राहील. हे माझ्याच्याने बघवणार नाहीच. आता तर तूझा हात धरून 'पुढे जाऊ नकोस गं, पुढे आणखीनच बिकट परिस्थिती होणार आहे, इथेच थांबव स्वतःला', असं म्हणत तुला थांबवण्याचं धाडसही होत नाही. कारण तुझ्यावर प्रेम करणारे अनेक आहेत. माझी नाही घेतलीस, पण तू त्यांची काळजी घे. त्यांना माहिती आहे, तू त्यांना सांभाळून घेशील, म्हणून ते तुझ्यापाशी आलेत. त्यांचा विश्वासघात करु नकोस. 

जाता-जाता एकच सांगेन, दुसऱ्यांची काळजी घेता घेता, थोडं लक्ष स्वताच्याही तब्बेतीकडे दे. तुझ्याच्याने आता फार दगदग होणार नाहीए. उगाच म्हाताऱ्या लहान पोरांसारखा हट्ट करु नकोस. सांभाळ स्वतःला. आता जे काही भलंबुरं होईल, त्याला जबाबदार तू स्वताच असशील, एवढं लक्षात ठेव.

 तुझा आणि तुझाच,
 एक्स मुंबईकर