Tue, Oct 24, 2017 16:57
29°C
  Breaking News  

होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळात विनय कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

मंत्रिमंडळात विनय कोरे, शेलार यांची वर्णी शक्य

Published On: Aug 13 2017 10:08AM | Last Updated: Aug 13 2017 11:17AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले असून या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. मात्र, यावेळी त्यांना घेतले जाण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

वारणा उद्योग समूह व जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे सर्वेसर्वा विनय कोरे हे भाजपशी संपर्कात असून भाजपमध्ये सामील व्हायचे की युती करायची, यावर चर्चा सुरू आहे. त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. कोरे यांना विधान परिषदेवर घेतले जाईल. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनाही मंत्रिमंडळात येण्याची इच्छा आहे. मुंबई महापालिकेतील भाजपला मिळालेल्या यशाचे बक्षिस शेलार यांना मिळण्याची शक्यता आहे.

काही मंत्र्यांकडील एकापेक्षा अधिक असलेली खाती काढून ती नव्याने येणार्‍या मंत्र्यांकडे दिली जातील. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडील उत्पादन शुल्क खाते कायम ठेवून ऊर्जा खाते बदलले जाण्याची शक्यता आहे. भाजपसोबतच शिवसेनेनेही आपल्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला असून दोन मंत्र्यांना पक्षकार्यास जुंपून त्यांच्या जागेवर विधानसभेतले चेहरे देण्याचा विचार सुरू असला, तरी तसे केल्यास अन्य आमदारांची नाराजी उफाळून येईल, अशी भीती पक्षनेतृत्वाला वाटत असल्याने तीच स्थिती कायम ठेवली जाईल, असे दिसते. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात शिवसेनेच्या वाट्याचे राज्यमंत्रिपद दिले जाईल, अशी अपेक्षा असून तिथेही कुणाला मंत्री करायचे, याचा तिढा पडला आहे. एकाला मंत्रिपद दिले की अन्य नाराज होण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.