Thu, Jan 24, 2019 19:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिग्नेश, उमर खलिद यांच्या विरोधात सर्च वॉरंट

जिग्नेश, उमर खलिद यांच्या विरोधात सर्च वॉरंट

Published On: Jan 04 2018 2:23PM | Last Updated: Jan 04 2018 2:29PM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी ऑनलाईन

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर मुंबईसह महाराष्ट्रात झालेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी गुजरातमधील दलित नेते आमदार जिग्नेश मेवानी आणि जेएनयूतील विद्यार्थी उमर खालिद यांचा सहभाग असलेल्या छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली. या दोघांविरोधात जुहू पोलिसांनी सर्च वॉरंट जारी केले असून, त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे छात्र भारतीच्या संतप्त विद्यार्थ्यांनी मुंबईत जुहू पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. 

विलेपार्ले येथील भाईदास सभागृहात छात्र भारतीचा कार्यक्रम होणार होता. सध्या  परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आहे. भीमा कोरेगाव येथील क्रांती स्तंभाला २०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यात शनिवारवाड्यावर आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद सहभागी झाले होते. आजचा विलेपार्ल्यातील कार्यक्रम आयोजित करण्यावर छात्रभारती संघटना ठाम असून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले. कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली आहे. त्यामुळे विलेपार्ल्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी छात्र भारतीय कार्यक्रमांच्या आयोजक असलेल्या विद्यार्थ्यांना अटक केली आहे.

 दरम्यान, राज्यभरातून आलेल्या सुमारे ४५० कार्यकर्त्यांना जूहू आणि विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. सभागृह परिसरात जमावबंदी लागू, सभागृहातील कार्यक्रमाचे बॅनर, टेबल आणि इतर साहित्य जप्त केली आहेत.