Mon, Mar 25, 2019 09:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ब्लॉग : लाड कोणाचे अन् प्रसाद कोणाला?

ब्लॉग : लाड कोणाचे अन् प्रसाद कोणाला?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : उदय तानपाठक

विधान परिषदेसाठी प्रसाद लाड यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी वाढली असून, निष्ठावंतांनी केवळ सतरंज्याच उचलायच्या काय, असा सवाल केला जात आहे. दरम्यान, लाड यांना उमेदवारीचे बक्षीस कसे मिळाले आणि त्याआधी कशा घडामोडी घडल्या, याचे किस्से रंगवून सांगितले जात आहेत. प्रसाद लाड हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले. अजित पवार यांचे ते अत्यंत विश्‍वासू मानले
जात होते. मात्र, त्यांना राष्ट्रवादीच्या सत्ता काळात फारसे काही मिळाले नाही. त्यामुळे सत्ता जाताच लाड यांनी सध्याच्या प्रघातानुसार भाजपमध्ये प्रवेश केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मागेपुढे गेल्या काही महिन्यांपासून लाड सतत दिसत होते. राणे यांनी रिकाम्या केलेल्या आमदारकीच्या जागेवर लाड यांचा डोळा होताच, मात्र केवळ ते मुख्यमंत्र्यांचे समर्थक म्हणून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. राणे यांना उमेदवारी दिली. असती, तर शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असता आणि माधव भांडारी यांना अशा अनिश्‍चित उमेदवारीत रस नव्हता. त्यामुळे विरोधकांना विजयाची संधी मिळणार नाही याची खबरदारी भाजपला घ्यावी लागणार होती. लाड यांना राष्ट्रवादीचा विरोध असण्याचे कारण नव्हते, कारण ते तर दादांचे लाडकेच होते. शिवसेनेलाही लाड यांना पाठिंबा द्यायला काही अडचण नव्हती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी लाड यांच्यावरच भाजपने टाकली होती. लाड यांनी मग मिलिंद नार्वेकर या जुन्या दोस्तालाच साकडे घातले. नार्वेकर यांनी उद्धव ठाकरे यांची काल रात्री एकच्या सुमारास भेट घालून दिली. 

‘मातोश्री’वर झालेल्या या भेटीच्या वेळी आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. उद्धव यांनी पाठिंबा देण्याचे मान्य केल्यानंतर लाड ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचले. त्यापूर्वी नारायण राणे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दोन तास चर्चा केली होती. दोन तासांच्या दीर्घ चर्चेनंतर राणेंची समजूत काढण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. जुलैमध्ये होणार्‍या विधान परिषद निवडणुकीत राणेंना उमेदवारीची हमी मुख्यमंत्र्यांनी दिली, असे म्हणतात. राणे ‘वर्षा’वरून बाहेर पडल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘वर्षा’वरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. याचवेळी लाड यांच्या नावावर शिक्‍कामोर्तब झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी लाड यांनीच घ्यावी, असा निर्णय या बैठकीत झाला. तसा निरोप ‘वर्षा’वरून मिळाल्यानंतर लाड यांनी मिलिंद नार्वेकर यांच्या मदतीने रात्री एक वाजता ‘मातोश्री’वर उद्धव आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा जाहीर केला.