Tue, Mar 19, 2019 09:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेयसीने दुसर्‍या प्रेयसीवर बलात्कार होताना काढला व्हिडीओ

प्रेयसीने दुसर्‍या प्रेयसीवर बलात्कार होताना काढला व्हिडीओ

Published On: Jul 16 2018 1:52AM | Last Updated: Jul 16 2018 1:51AMभिवंडी : वार्ताहर

पहिल्या प्रेयसीने प्रियकराचा पिच्छा सोडविण्यासाठी दुसर्‍या प्रेयसीला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर एका नराधमाकरवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भिवंडीत समोर आली. पहिली प्रेयसी एवढ्यावर थांबली नाही तर तिने दुसर्‍या प्रेयसीवर बलात्कार होताना चित्रीकरण करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल केले. 

भयपटाच्या कथेसारखा हा धक्कादायक प्रकार शहरातील गायत्रीनगर परिसरात घडला. शांतीनगर पोलीस ठाण्यात दोघांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून ‘त्या’ प्रेयसीवरही गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

सतीश ऊर्फ भीमराव नकलवार (38. रा. गायत्रीनगर), सलीम मोईन खान (30, रा. अमिनाबाग), राबिया खान (25) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या तिघांना रविवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात  आली आहे. पीडित तरुणी मुंबईच्या कफ परेड भागात राहणारी असून तिची काकू भिवंडीच्या गायत्रीनगर परिसरात राहते. 12 ऑगस्ट 2015 रोजी ही तरुणी भिवंडीत आली होती. ती परिसरात  मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेली असता तिची ओळख सतिशसोबत झाली. सतीशने ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर फिरण्याचा बहाणा करीत तिला वेळोवेळी बोरपाडा हद्दीतील राज आणि प्रियांका लॉजवर नेऊन अत्याचार केला. सतीशची पहिली प्रेयसी राबिया हिला दोघांच्या प्रेमसंबंधांची कुणकुण लागल्याने तिने पीडितेला फोन करून आपले व सतीशचे प्रेमसंबध आधीपासून आहेत. यामुळे तू त्याचा पिच्छा सोड, असे सांगत तिच्याशी वाद घातला. 

याचदरम्यान, पीडित तरुणीला राबिया तिच्या घरी बुरखा घालून घेऊन गेली. घरी जाताच तिला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर सलीमकरवी बलात्कार होतानाचा राबियाने मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. दुसर्‍या दिवशी राबियाने हा व्हिडीओ पीडितेला दाखवला. तसेच ब्लॅकमेल करून तिच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली. यामुळे भयभीत झालेल्या पीडितेने 43 हजार रुपये तिला दिले. तरीही तिला धमकी देण्याचा प्रकार सुरूच होता.

आपली समाजात बदनामी होईल या भीतीने पीडितेने खडवली नदीत आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचले होते. नदीत उडी घेण्यापूर्वी तिने मैत्रिणीला फोन करून माहिती दिली. त्यावेळी मैत्रिणीने तिला समजावत पोलीस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिने कुलाबा पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. कुलाबा पोलिसांनी झिरो नंबरने गुन्हा दाखल करून शांतीनगर पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग केला. त्यानुसार शांतीनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन गोंजारी करीत आहेत.  

जबरदस्तीचे संबंध अन् सतत गर्भपात

सतीशचे लग्न झाले असून त्याला दोन मुले असल्याचे समजल्यावर पीडित तरुणीने प्रेमसंबंधास नकार दिला. मात्र तरीही त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. या अत्याचारातून पीडिता दीड महिन्यांची गरोदर राहिल्याने तिने सतीशला या घटनेची माहिती दिली. त्यावर त्याने पुन्हा प्रेमाचे नाटक करून तिला गर्भपात होण्यासाठी गोळ्या दिल्या होत्या. अशाप्रकारे 2015 ते जून 2018 पर्यंत वारंवार होणार्‍या अत्याचारामुळे आणखी तीन वेळा तिचा सतीशने गर्भपात केला.