Wed, Jul 24, 2019 06:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

बापाच्या अनैतिक संबंधात गेला चिमुरडीचा बळी

बापाच्या अनैतिक संबंधात गेला चिमुरडीचा बळी

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 2:24AMविरार : वार्ताहर

शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्‍या प्रियकराला धडा शिकवण्यासाठी त्याच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार घडवून आणण्याचे भयानक कृत्य प्रेयसीने केल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधातून घडलेल्या या प्रकारामुळे विवाहित महिलांमध्ये आपल्या नवर्‍यांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

विरारच्या पश्चिमेकडी एक्सपर्ट शाळेत शिकणारी चार वर्षीय बालिकेचे शनिवारी अपहरण झाले होते. मुलीची आत्या असल्याचे भासवून तिला शाळेतून एका महिलेने नेल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मुलीचा आणि अपहरणकर्त्या महिलेचा सर्वत्र शोध घेण्यात येत होता. त्याचवेळी सदर मुलगी महालक्ष्मी स्थानकाच्या सिग्नलजवळ एका पोलीसाला बेशुद्धावस्थेत आढळून आली. त्याने तिला उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्यावेळी ही धक्कादायक बाब समोर आली. सदर बालिकेवर लैंगीक अत्याचार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर मुंबई पोलीसांत गुन्हा दाखल होवून तपास सुरु झाला. एक महिला बालिकेला बेशुद्धावस्थेत सिग्नलजवळ ठेवताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. तसेच बालिकेच्या गणवेशावरून पोलीसांनी विरारच्या शाळेचा तपास लावला. त्यानंतर अर्नाळा-विरार पोलीसांच्या मदतीने मुंबई पोलीसांनी अपहरण करणार्‍या महिलेला शोधून काढले. वसईच्या पूर्व पट्टीतील चांदीप गावात राहणार्‍या ज्योती कांबळे हिने हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे.

त्यानंतर हा गुन्हा अर्नाळा पोलीसांकडे वर्ग करण्यात आला. ज्योतीचे तिच्याच परिसरात राहणार्‍या सचिन गायकवाड याच्याशी प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. मात्र, सचिनने दुसर्‍याच मुलीशी लग्न केले. लग्नानंतरही या दोघांचे शारीरिक संबंध सुरुच होते. त्यातून दोनवेळा ज्योतीचा गर्भपातही झाला होता. तरीही सचिन लग्न करत नसल्यामुळे संतापलेल्या ज्योतीने सूड उगवण्याचा कट रचला. माझी दोन्ही मुले गर्भातच मारली गेली. त्यामुळे मुलांचे दुःख काय असते हे सचिनला कळण्यासाठी ज्योतीने त्याच्या मुलीचे अपहरण केले आणि तिला महालक्ष्मी स्थानकात सोडून दिले. तिथे तिच्यावर लैंगीक अत्याचार घडवून आणल्याची कबुलीही तिने दिली आहे.