होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेमविवाहानंतर ‘ती’ ठरली जातीचा बळी!

प्रेमविवाहानंतर ‘ती’ ठरली जातीचा बळी!

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 1:21AMडोंबिवली : वार्ताहर

खासगी कंपनीत नोकरी करणार्‍या दोघांचे प्रेमप्रकरणातून लग्न झाले. मात्र, ती खालच्या जातीची असल्याचे कारण दाखवून घरच्यांनी त्यांचे लग्न नाकारले. त्यांनी तिला घरात घेतले असले तरी तिचा छळ करण्याबरोबरच तिला मोलकरणीची वागणूक दिली व आपल्या मुलाच्या दुसर्‍या लग्नाचा घाट घातला. त्यानंतर सदर तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती, सासू-सासरा आदींसह पाच जणांवर तक्रार दाखल केली आहे. ते सर्व पिसवली गावचे रहिवासी आहेत.   

मुंबई येथे राहणारी तरुणी व कल्याण-शिळ मार्गावरील पिसवली गावात राहणारा निनाद देसाई हे दोघे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. काही दिवसांनी दोघांच्या ओळखीचे रूपांतर मैत्री आणि त्यानंतर प्रेमात झाले. या दोघांनी काही महिन्यांपूर्वी एका संस्थेमार्फत प्रेमविवाह केला होता. मात्र या प्रेमविवाहाला जातीच्या भिंती आड आल्या. सदर तरुणी मागास जातीची असल्याने निनादच्या कुटुंबीयांनी तिला स्वीकारण्यास नकार दर्शविला. 

आपल्या जातीच्या खोट्या इभ्रतीच्या भ्रमात असलेल्या निनादच्या कुटुंबीयांनी समाजात बदनामी होईल म्हणून या तरुणीचा छळ सुरू केला. या छळात निनाद यानेही त्याच्या कुटुंबाला साथ दिली. मुळात लग्न झाल्याचे लपविण्यास तिला सांगितले. तसेच तिला माहेरचे नाव कांबळे असल्याचे कुणाला सांगू नकोस, तर पाटील असल्याचे सांगण्यास भाग पाडले. शिवाय कामवाली किंवा बाजूवाली असल्याचे सांगण्यासही या तरुणीला भाग पाडले. 

अखेर या पीडितेच्या सहनशिलतेचा अंत झाल्याने तिने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार कथन केला. दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पीडितेचा पती- निनाद, सासू -अनिता, सासरा -आबा, दीर -निखील, जाऊ -प्रणाली अशा पाच जणांच्या विरोधात भादंवि कलम 498 (अ) 34 सह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सन 1989 चे कलम 3 (1) (2) (10) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर करीत आहेत.