Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलगर्दीचा डोंबिवलीत पुन्हा एक बळी

लोकलगर्दीचा डोंबिवलीत पुन्हा एक बळी

Published On: Apr 12 2018 1:42AM | Last Updated: Apr 12 2018 1:42AMडोंबिवली/कल्याण: वार्ताहर

एकीकडे सरकार बुलेट ट्रेनच्या वार्ता करीत असले तरी मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या लोकलमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना बसण्यासाठी तर सोडाच, चढतानाही तारेवरची कसरत करावी लागते. लोकलमध्ये असलेल्या गर्दीतून इच्छित स्थळ गाठताना अनेकदा प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. गर्दीने भरलेल्या लोकलमधून पडून रजनीश सिंग (30) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान घडली. यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे हे दोघे लोकलच्या गर्दीचे बळी ठरले असतानाच, राजनीशच्या मृत्यूने डोंबिवली पुन्हा एकदा हळहळली आहे.

रजनीश सिंग हा डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील शलाका अपार्टमेंटमध्ये राहात होता. परळ येथील सुझुकी मोटर कंपनीत तो व्यवस्थापक म्हणून काम करत होता. बुधवारी सकाळी कल्याण-सीएसटी ही जलद लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात 8 वाजून 40 मिनिटांनी आली. या लोकलमध्ये रजनीश चढला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने रजनीशला आत शिरता आले नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाजातच उभा होता. मात्र गर्दीचा रेटा अधिक असल्याने डोंबिवली-कोपर रेल्वेस्थानकादरम्यान रजनीश लोकलमधून खाली पडला. 

ही घटना घडली तेव्हा त्याच रेल्वेच्या डब्यातून प्रवास करणार्‍या ईगल ब्रिगेड सदस्य अमित मोरे यांनी तात्काळ या अपघाताची माहिती जीआरपीच्या हेल्पलाईनला दिली. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचेवरिष्ठ पोलीस निरीक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांना ही माहिती समजताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत या घटनेत जखमी झालेच्या रजनीशचा मृत्यू झाला होता. डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात रजनीशच्या अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रजनीशच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. रजनीशच्या अपघाती मृत्यूने सिंग कुटंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

आणखी किती बळी हवेत? 

देशाचे पंतप्रधान बुलेट ट्रेनच्या बाता करतात. मात्र, सरकारने आधी लोकलमधील वाढत्या गर्दीवर मार्ग काढावा. यापूर्वीही गर्दीने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सरकारला आणखी किती बळी हवेत? असा संतप्त सवाल मृत रजनीशचा भाऊ अमरीश सिंग याने केला आहे.

Tags : mumbai, mumbai news, victim again, local crowded, Dombivli,