Wed, May 22, 2019 06:25होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कोवळ्या वयातील लैगिंक शोषणाची जखम आजही सलते’

‘कोवळ्या वयातील लैगिंक शोषणाची जखम आजही सलते’

Published On: Mar 23 2018 2:01PM | Last Updated: Mar 23 2018 4:43PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारतीय चित्रपटसृष्टीत बालकलाकार आणि ‘आंटी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेष्ठ अभिनेत्री डेझी इराणी यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. बालकलाकार म्हणून काम करत असताना माझ्यावर बलात्कार करून लैंगिक शोषण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या लैंगिक शोषणाच्याविरोधात सुरु असलेल्या #Metoo या मोहिमेवेळी त्यांनी स्वत:च्या वेदनेची वाचा फोडली. मुंबई मिरर या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबतचा सविस्तर खुलासा केला आहे. 

बॉलिवूडमधील नृत्य दिग्दर्शक फराह खान आणि अभिनेता फरहान अख्तर यांच्या आंटी डेझी आता ६० वर्षांच्या आहेत. बाल कलाकार म्हणून काम करत असताना त्यांना सहन करावा लागलेला हा मानसिक धक्का त्यांनी 54 वर्षानंतर जगासमोर आणला आहे. सध्या चित्रपट आणि टिव्ही शोमध्ये अनेक मुले काम करतात त्यांच्या काळजीपोटीच त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला आहे. या मुलांच्या पालकांनी जागरूक राहून मुलांचे संरक्षण करावे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.  

काय होता नक्की तो प्रसंग

ज्या व्यक्तीने माझ्यासोबत हा किळसवाणा प्रकार केला त्याने माझे पालकत्व स्वीकारले होते. ‘हम पंछी एक डाल के’ या चित्रपटाच्या शूटसाठी तो मद्रासला जाणार होता. त्याने मलाही सोबत नेले होते. याच शूटींगवेळी एका रात्री तो माझ्या खोलीत आला. त्या रात्री त्याने मला दूषित केले. अत्याचार केल्यानंतर त्याने मला पट्ट्याने मारहाण सुद्धा केली. त्या रात्री बंद खोलीत जे काही घडले ते कोणालाही सांगू नकोस; अशी धमकी ही त्याने दिल्याचे, डेझींनी सांगितले. 

आईच्या स्वप्नासाठी डेझी चित्रपटसृष्टीत

आईची इच्छा होती म्हणून डेझी वयाच्या चौथ्याच वर्षी चित्रपटात आल्या. त्या बालवयातही एकावेळी अनेक शिफ्टमध्ये काम करत होत्या. त्याकाळात त्यांनी एकूण ५० चित्रपटांमध्ये लहान मुलांची भूमिका साकारली होती. यामध्ये 'नया दौर', 'धूल का फूल' या चित्रपटांचा समावेश आहे. 

अभिनय कौश्यल्याने डेझी यांनी अल्पावधितच अनेकांची मने जिंकली. या प्रसिद्धीनंतर अनेक भूमिका फक्त डेझी यांच्यासाठीच लिहिल्या गेल्या. त्याकाळातील अशोक कुमार, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, वैजयंतीमाला,मीना कुमारी यांसारख्या दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत डेझी यांनी काम केले. या सर्व कलाकारांपैकी मीना कुमारी माझ्या खूप जवळच्या होत्या. माझ्या आई प्रमाणेच त्या माझ्यावर प्रेम करायच्या, असेही डेझी यांनी सांगितले. 

कोण होता तो..?

‘त्या माणसाचे नाव नझार असे असून त्याचे आता निधन झाले आहे, तो प्रसिद्ध गायिका जोहराबाई अंबालेवाली यांच्या नात्यातील होता. त्यामुळे त्याला चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या ओळखी होत्या. माझ्या आईला मी मोठी स्टार झालेली पहायचे होते. मी ‘बेबी’ या मराठी चित्रपटातून मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्या चित्रपटावेळी नझार अंकलनी मला पाहिले होते. म्हणून त्यांनी मला ‘दो पंछी एक डाल के’ या चित्रपटाची ऑफर दिली. त्याच्यासोबत मी मद्रासला गेले. तिथे जो प्रसंग घडला तो आजही मला तुकड्यांमध्ये आठवतो. त्याने केलेल्या अत्याचार आणि मारहाणीमुळे झालेल्या यातना मला आजही स्पष्ट आठवतात. त्या रात्रीनंतर काहीच घडले नसल्याच्या आवेशात मी स्टुडिओमध्ये गेले होते, त्यानंतर अनेक वर्षे ही गोष्ट आईच्या कानावर घालण्याचे धाडस मला झाले नाही.

मी फक्त इतकेच म्हणू शकते. मी जस जसे मोठे होत गेले तसे माझ्यातील राग वाढत गेला. मी पुरूषांशी अधिक रागाने बोलत गेले. मला माहितीच नव्हते की मी असे का वागतेय. मी उद्धट बनत गेले. काही काळ लोटल्यानंतर मद्रासमध्ये माझ्यासोबत नक्की काय घडले हे आईला समजले. पण, त्यावेळी ती काय करू शकणार होती?, असेही त्या म्हणाल्या.

Tags : Daizy Irani, Rape, Child Artits, Actress, Metoo