Mon, May 20, 2019 18:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे निधन

विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे निधन

Published On: Jan 04 2018 11:32PM | Last Updated: Jan 05 2018 12:48AM

बुकमार्क करा
ठाणे : प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्याच्या राजकारणातील वजनदार नेता आणि सर्व पक्षीयांचे मित्र म्हणून परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गुरूवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पुत्र आमदार निरंजन डावखरे, प्रबोध डावखरे, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून त्यांचे पार्थिव त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

गेले वर्षभर ते आजारीच होते. मूत्रपिंड आणि हृदय विकाराचा त्रास असल्यामुळे त्यांना 20 नोव्हेंबर 2017 रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही झाली होती. मात्र काही दिवसांनी प्रकृती खालावल्याने त्यांना कृत्रिम श्‍वसन यंत्रणेवर ठेवण्यात आले होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विश्‍वासू नेत्यांपैकी वसंत डावखरे एक होते. 

मुळचे पुणे येथील शिरूर गावचे असलेल्या डावखरे यांच्या कुटुंबाने दुष्काळाचे चटके सहन केल्यानंतर उदर निर्वाहासाठी ठाणे गाठले.  माजी गृहमंत्री कै. बाळासाहेब देसाई यांचा हात पकडून ते राजकारणात आले. सुमारे 15 वर्षे त्यांनी देसाईंचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. ठाण्यात वास्तव्यास असून देखील पुण्यातील हिवरे गावचे सरपंच पदही त्यांनी 1980-85 च्या दरम्यान भूषवले. 1986 मध्ये ठाणे महापालिकेच्या स्थापनेनंतर पहिली निवडणूक लढवत नौपाड्यातून प्रभाग क्र. 47 मधून काँग्रेसचे नगरसेवक झाले. त्याचवेळी त्यांचा संपर्क शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आला. त्यांचे बाळासाहेबांशी शेवटपर्यंत सौहार्दाचे संबंध राहिले होते. 1987 मध्ये ते ठाण्याचे महापौर झाले. 1992 पासून ते विधानपरिषदेवर सलग चार वेळा निवडून गेले होते.