Fri, Jan 18, 2019 21:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाङ्मयचौर्य केले तर प्राध्यापकाची जाणार नोकरी

वाङ्मयचौर्य केले तर प्राध्यापकाची जाणार नोकरी

Published On: Aug 05 2018 1:43AM | Last Updated: Aug 05 2018 12:54AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

वाड्मयचौर्य हा प्रकार आपल्याकडे काही नवा नाही. कुणाचीही कथा, कविता आपल्या नावे खपवणारे हजारो साहित्यिक आपल्या आजुबाजूला भेटतात. पीएचडीसाठी सादर केल्या जाणार्‍या प्रबंधातही अशा घटना घडल्या आहेत. मात्र या प्रकाराला आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने कडक निर्देश जारी केले आहेत. उच्च शिक्षण संस्थांसाठी जारी केलेल्या नव्या निर्देेशांनुसार वाड्मयचौर्याच्या आरोपात दोषी आढळल्यास विद्यार्थ्याची नोंदणी रद्द होऊ शकते, तसेच प्राध्यापकाला नोकरीही गमवावी लागू शकते. 

नव्या नियमानुसार संस्थांना वाड्मयचौर्य शोधणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याची सक्‍ती करण्यात आली आहे. त्याशिवाय संस्थांना आपले विद्यार्थी, शिक्षकवृंद, संशोधक आणि इतर कर्मचारी यांनाही या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. 

वाड्मयचौर्याचे चार स्तर आहेत. शून्य स्तरात कोणत्याही दंडात्मक कारवाईची तरतूद नसून, तिसर्‍या स्तरावर मात्र अभ्यासक्रमासाठीची नोेंदणी रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. आणि एखाद्या घटनेत संबंधिताने पदवी प्राप्‍त केली असेल, तर त्याला हस्तलिखित मागे घेण्याची, दोन वेतनवाढी नाकारण्याची तसेच पदव्युत्तर, एम. फिल, पीएचडीसाठी पर्यवेक्षक म्हणून तीन वर्षे बंदी घालण्याची शिफारस करण्यात आली आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्चमध्ये झालेल्या बैठकीत या निर्बंधांना मान्यता दिली असून, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर हे निर्बंध अधिसूचित करण्यात आले आहेत. या कारवाईसंदर्भातील सर्व अडथळे आणि समस्या दूर करण्याचा अधिकार विद्यापीठ अनुदान आयोगाने राखून ठेवले आहेत. 

प्रबंध सादर करणार्‍या प्रत्येकाला संबंधित प्रबंध आपणच लिहिला आहे, आणि तो अस्सल आहे, असे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. सदर प्रबंध संस्थेने वाड्मयचौर्य शोधक सॉफ्टवेअरकडून तपासण्यात आल्याचेही या हमीपत्रात नमूद करावे लागणार आहे. त्याशिवाय प्रत्येक पर्यवेक्षकाला संबंधित विद्यार्थ्याने आपल्या हाताखाली केलेले काम वाड्मयचौर्यमुक्‍त असल्याचे प्रमाणपत्रही द्यावे लागणार आहे. 

शैक्षणिक क्षेत्रातील एखाद्या व्यक्‍तीने कागदोपत्री पुराव्यासह वाड्मयचौर्याचा संशय व्यक्‍त केल्यास त्याला डिपार्टमेंटल अ‍ॅकॅडमिक इंटिग्रिटी पॅनेलकडे दाद मागावी लागणार आहे.  डिपार्टमेंटल अ‍ॅकॅडमिक इंटिग्रिटी पॅनेल त्याची चौकशी करणार असून, आपल्या सूचना इन्स्टिट्युशनल अ‍ॅकॅडमिक इंटिग्रिटी पॅनेल ऑफ द हायर एज्युकेशन इन्स्टीट्युशनला सादर करील. आणि त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. 

वाङ्मयचौर्याचे स्तर

स्तर 0 :     10 टक्के साम्य असेल तर दंडत्मक कारवाई नाही. 
स्तर 1 :     10 ते 40 टक्के साम्य असेल तर सुधारित हस्तलिखित विहित कालावधीत सादर करावे 
लागेल. त्याचा कालावधी 6 महिन्यांपेक्षा अधिक असणार नाही. 
स्तर 2 :     40 ते 60 टक्के साम्य असल्यास-विद्यार्थ्यांला सुधारित हस्तलिखित सादर करण्यास 1 
वर्षासाठी बंदी 
स्तर 3 :     60 टक्केच्या पुढे साम्य असल्यास - अभ्यासक्रमासाठी नोंदणी रद्द

आधीच पदवी मिळाली असल्यास

स्तर 1 :     10 ते 40 टक्के साम्य असल्यास - हस्तलिखित मागे घ्यावे लागेल. 
स्तर 2 :     40 च्या पुढे आणि 60 टक्केपर्यंत साम्य असल्यास - हस्तलिखित मागे घ्यावे लागेल, वार्षिक वेतन वाढीस नकार, पदव्युत्तर, एम.फिल आदी अभ्यासक्रमांत पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास 2 वर्षे बंदी 
स्तर 3 :     60 टक्केहून अधिक साम्य असल्यास - हस्तलिखित मागे घ्यावे लागेल, सलग दोन वर्षे वेतनवाढीस नकार, पर्यवेक्षक म्हणून काम करण्यास तीन वर्षे बंदी.