Tue, Nov 19, 2019 10:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धनगर आरक्षणावरुन विधान परिषदेत गदारोळ

धनगर आरक्षणावरुन विधान परिषदेत गदारोळ

Published On: Jun 27 2019 1:16PM | Last Updated: Jun 27 2019 1:14PM
मुंबई : प्रतिनिधी 

धनगर आरक्षणावरुन गुरुवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. एकमेकांविरोधात झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे सुरूवातीला दोन वेळा दहा मिनिटांसाठी आणि त्यानंतर तासाभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले.

आज सभागृहात धनगर आरक्षणावर आल्पकालीन चर्चा आयोजित करण्यात आली होती. धनगर समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे अशी आग्रही मागणी विरोधकानी लावून धरली.  सरकार जाणिवपूर्वक विलंब करीत आसल्याचा आरोप काँग्रेसचे भाई जगताप यांनी  केला. धनगर समाजास त्वरीत एस. टी. प्रवर्गाचे आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. 

चर्चेदरम्यान, 'आरक्षण तुमच्या बापाचे नाही, कोणाची जहांगीरी नाही, असे शब्दप्रयोग विरोधकांकडून वापरले गेले. तुम्ही सरकारची तळी उचलून धरता असा आरोप भाई जगताप यांनी प्रवीण दरेकर आणि अन्य सदस्यांवर केला. सत्ताधारी सदस्यांनी त्याला आक्षेप घेतला. त्यामुळे एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. दोन्हीकडील सदस्य वेलमध्ये उतरले. त्यामुळे झालेल्या गोंधळात तालिका सभापती ॲड. हुस्नबानू खलिपे यांनी सुरूवातीला दोन वेळा दहा मिनिटांसाठी आणि त्यानंतर तासाभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.