Thu, Jul 18, 2019 08:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकतर्फी प्रेमातून ठाण्यात तरुणीची हत्या

एकतर्फी प्रेमातून ठाण्यात तरुणीची हत्या

Published On: Aug 04 2018 3:12PM | Last Updated: Aug 04 2018 6:22PMठाणे : प्रतिनिधी 

दुचाकीवरून घोडबंदरकडे जाणार्‍या 22 वर्षीय प्राची झाडे या तरुणीवर आकाश पवार (25) या भिवंडीच्या तरुणाने धारदार चाकूने सपासप वार केले आणि स्वत:ही धावत्या बसखाली उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचार सुरू असतानाच प्राचीचा मृत्यू झाला आणि हा माथेफिरू आकाश मात्र बचावला आहे. शनिवारी सकाळी  हा भयंकर प्रकार घडला. 

आत्महत्येचा प्रयत्न फसताच त्याच्या मित्रांनी त्याला बाईकवर बसवून पलायन केले तर जखमी अवस्थेतील प्राचीला दोघा तरुणांनी क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्राचीचा मृत्यू झाला. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन हल्लेखोर आकाश पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

प्राची झाडे (22) रा. कोपरी, ठाणे ही जोशी-बेडेकर महाविद्यालय आर्ट्स आणि कॉमर्समध्ये बीकॉमच्या दुसर्‍या वर्षात शिकत होती. शनिवारी सकाळी 11-30 ते 12 च्या दरम्यान प्राची अ‍ॅक्टिव्हावरून घोडबंदरकडे निघाली होती. ती एलआयसी कार्यालयाजवळील आरटीओ कार्यालयासमोरील महामार्गावर येताच  पल्सर बाईकवरून तिच्या मागावर असलेल्या आकाश पवारने तिला गाठले आणि तिच्या गळ्यावर, पोटावर, छातीत आणि दोन्ही हातांवर सपासप वार केले. प्राची खाली कोसळताच आकाशने धावणार्‍या बसखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बसचालकाने ब्रेक मारल्याने हल्लेखोर बसला धडकला आणि जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्राचीला कुणीही मदतीचा हात न देता नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. मात्र, तेवढ्यात जखमी अवस्थेत पडलेल्या हल्लेखोर आकाश पवार याला त्याच्या अज्ञात मित्राने बाईकवर बसवून पोबारा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्राचीला रस्त्यावरून जाणार्‍या राज तिवारी आणि परेश कांबळे यांनी क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान प्राचीचा मृत्यू झाला. 

दीड महिन्यांपूर्वी आकाशच्या विरोधात तक्रार करूनही कापूरबावडी पोलीस गप्प बसले प्राचीने दीड महिन्यांपूर्वी कापूरबावडी पोलीस ठाण्यात हल्लेखोर आकाश पवारविरोधात एक तक्रार दाखल केली होती. त्याच वेळी त्याच्यावर चॅप्टर केस चालविण्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले होते. या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली असती तर आज ही हत्या झाली नसती, अशी प्रतिक्रिया मृत प्राचीचे वडील विकास झाडे यांनी व्यक्त केली.

एक दशकापूर्वी  इंटर्निटी मॉलच्या बाजूच्या  दुकानावरून घडलेल्या खन्ना बंधूंच्या हत्याप्रकरणी आरोपी म्हणून विकास झाडे यांना ठाणे न्यायालयाने जन्मठेप ठोठावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडले. प्राचीच्या हत्येमागे अर्थात हे कारण नसून एकतर्फी प्रेम असल्याचेच स्पष्ट झाले आहे.

रिक्षाचालकांची मुजोरी; अन्यथा प्राचीचे प्राण वाचले असते 

हल्लेखोर आकाश पवार याने भररस्त्यात खुनी हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली. प्राचीच्या शरीरातून रक्तप्रवाह मोठ्या प्रमाणात होत होता. यावेळी रस्त्यावरून जाणार्‍या राज तिवारी आणि परेश कांबळे यांनी गर्दी बघून प्राचीला रुग्णालयात नेण्याचे धाडस दाखविले. मात्र 10 ते 12  रिक्षाचालकांनी नकार दिल्याने तब्बल 15 मिनिटे प्राची रक्ताच्या थारोळ्यात पडून होती. जर रिक्षाचालकांनी त्वरित मदत दिली असती तर निश्चितच प्राचीचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रिया तिला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या राज तिवारी आणि परेश कांबळे यांनी व्यक्त केली.