Tue, Jul 16, 2019 13:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पीएचडीधारक शिक्षकांना नेट-सेटमधून वगळणे अन्यायी 

पीएचडीधारक शिक्षकांना नेट-सेटमधून वगळणे अन्यायी 

Published On: Jul 06 2018 1:33AM | Last Updated: Jul 06 2018 1:10AMमुंबई : प्रतिनिधी

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॉलेज व विद्यापीठांमध्ये शिक्षकांची पात्रता व पदोन्नतीसाठीच्या निकषांमध्ये बदल करून पीएचडीधारकांना नेट/सेटमधून वगळण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय नेट/सेट पात्रताधारकांच्या न्याय्य हक्कांवर गदा आणणारा आहे, असा आरोप  नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशनने केला आहे. पीएचडी धारकांना नेट, सेटमधून सूट देत शिक्षक नियुक्ती आणि शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पात्र ठरवणार्‍या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या निर्णयाला नेट, सेट धारकांनी कडाडून विरोध केला आहे. तसा 56 पानांचा अभिप्राय यूजीसी मसुदा अधिसूचना 2018 ला नेट सेट धारकांच्या नॅशनल फोरम फॉर क्वालिटी एज्युकेशन मंचाने पाठवला आहे. 

मुंबई प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मंचाचे अध्यक्ष रमेश झाडे यांनी ही माहिती दिली. शासनाचा हा निर्णय बेकायदेशीर असून त्यामुळे शिक्षणाचा दर्जा ढासळणार आहे. मुळात पीएचडीला वारंवार सूट दिल्याने नेट व सेट पात्र उमेदवार बेरोजगार राहणार आहेत. पीएचडीचे मानक आणि गुणवत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी शासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही. पीएचडी करण्यामध्ये होणारे गैरव्यवहार, वाड:मय चौर्य, फेव्हरिसम यांसारख्या प्रकारामुळे गुणवत्तेचा दर्जा टिकलेला नाही. पीएचडीधारकांना नेट, सेट पात्र उमेदवारांप्रमाणे संपूर्ण विषयांच्या ज्ञानाची प्राथमिक अपेक्षाही पूर्ण करता येत नाही. त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे देशातील उच्च शिक्षणातील गुणवत्ता व दर्जामध्ये तडजोड होणार आहे, असा आरोपही झाडे यांनी यावेळी केला.