होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जलबोगद्याचे काम अडकणार आता टक्क्याच्या वादात!

जलबोगद्याचे काम अडकणार आता टक्क्याच्या वादात!

Published On: Jul 03 2018 2:25AM | Last Updated: Jul 03 2018 2:25AMमुंबई  : प्रतिनिधी

चेंबूर अमर महल ते ट्रॉम्बे जलाशय आणि अमर महल ते शीव प्रतीक्षा नगर व पुढे परळमधील सदानन ढवण मैदानापर्यंत रखडलेल्या भुयारी जल बोगद्याच्या कामाला अखेर सुरुवात होणार आहे. या कामासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपये खर्च येणार होता. पण कंत्राट मिळवण्यासाठी  कंत्राटदारांनी वाटाघाटीनंतर 28 ते 29 टक्के दर कमी करून काम करण्याची तयारी दर्शवल्याने हे कंत्राट वादात अडकण्याची शक्यता आहे.

गोवंडी,देवनार, चेंबूर, कुर्ला आणि शहरातील भायखळा,नागपाडा आदी भागातील पाणी पुरवठा  सुरळीत करण्यासाठी अमर महल (हेगडेवार उद्यान) ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंत जलबोगद्याचे काम महापालिकेच्यावतीनं हाती घेण्यात येणार आहे. 5.53 कि.मी लांबीचा व अडीच मीटर व्यासाचा हा जमिनीपासून 110 ते 120 फुट खोलवर बोगदा खोदाई यंत्राच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. यासाठी नेमलेल्या महापालिकेच्यावतीने टीसीई यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी बनवलेल्या अंदाजानुसार मागवलेल्या निविदांमध्ये पात्र ठरलेल्या कंपनीने 39 टक्के जादा दराने निविदा भरल्या. परंतु वाटाघाटीनंतर या कंपनीने 9.72 टक्क्यांमध्ये काम करण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे यासाठी पात्र ठरलेल्या पटेल कंपनीला हे काम 904 कोटींमध्ये दिलं जाणार आहे.

हेगडेवार उद्यान (अमर महाल) ते प्रतीक्षा नगर आणि पुढे परळ सदाकांत ढवणपर्यंत जलबोगद्याचे काम हाती घेतलं जात आहे. हा जलबोगदा 9.7 कि.मी लांबीचा असून अडीच मीटर व्यासाचा आहे. या कामासाठी 604 कोटीं रूपये अंदाजित खर्च येईल असे अपेक्षित धरण्यात आले होते. पण 39.73 टक्के जादा दराच्या निविदा भरून  सोमा एंटरप्रायझेस या कंत्राटदारांने हे कंत्राट मिळवले. त्यामुळे या कामाचा खर्च 1125 कोटी रूपयावर पोहचला. या कंपनीनेही वाटाघाटीनंतर 10.38 टक्क्यांमध्ये जादा दराने काम करण्यास तयारी दर्शवली आहे. या दोन्ही कंपन्यांनी सल्लागारांनी जो अंदाजित खर्च निश्चित केला होता. त्यापेक्षा 34 ते 38 टक्के अधिकची बोली लावून कंत्राटदार पात्र ठरले आणि वाटाघाटीनंतर त्यांनी 28 ते 29 टक्के दर कमी करण्यास तयारी दर्शवली. त्यामुळे यामध्ये सल्लागार पूर्णपणे असफल ठरले असून या सल्लागारांच्या चुकीच्या अनुमानामुळे महापालिकेची लुट होत असल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे या कंत्राटाला तीव्र विरोध होण्याची  शक्यता वर्तवली जात आहे. कंत्राटदारांनी जास्त बोली लावून एकप्रकारे महापालिकेची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता, हे वाटाघाटीनंतर कमी केलेल्या दरानंतर स्पष्ट झाले आहे.