भिवंडी : वार्ताहर
भिवंडी महापालिका क्षेत्रातील गायत्रीनगर येथील सरदार कंपाऊंड येथे असलेल्या भंगार गोदामांना भीषण आग लागून भंगाराची 23 गोदामे व त्या लगतच्या 6 झोपड्या जळून खाक झाल्याची घटना बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच भिवंडीसह कल्याण व उल्हासनगर येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत ही आग तब्बल सहा तासानंतर आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले आहे.
गायत्रीनगर परिसरातील सरदार कंपाऊंड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत भंगार गोदामे असून त्या ठिकाणी प्लास्टिक, धाग्याचे लोचन, प्लास्टिक पिशव्या यांचे भंगार मोठ्या प्रमाणावर साठविले जाते. बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास याठिकाणी अचानक भीषण लागली. पहाता पहाता ही आग सर्व गोदामांमधून पसरत आगीची व्याप्ती वाढली. या आगीची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु आग मोठी असल्याने व ती पसरल्यास नजीकच्या झोपडपट्टीला नुकसान होऊ शकते हे लक्षात आल्यावर कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर मनपाच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग विझविण्यासाठी पाणी कमी पडत असल्याने भिवंडी मनपाचे पाण्याचे टँकर व खासगी टँकरच्या मदतीने सहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणण्यात यश आले.