Wed, Feb 19, 2020 09:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा आजपासून बेमुदत बंद

विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचा आजपासून बेमुदत बंद

Published On: Dec 11 2017 1:55AM | Last Updated: Dec 11 2017 1:37AM

बुकमार्क करा

मुंबई : वार्ताहर

महाराष्ट्रात 2002 सालापासून सुरू झालेल्या; परंतु अनुदानापासून दीर्घकाळ वंचित राहिलेल्या राज्यातील 3200 विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांतील 22 हजार 500 शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून (सोमवार) बेमुदत बंद पुकारला आहे. संबंधित शिक्षक सोमवार पासून नागपूर येथे सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी 206 वे आंदोलन करत आहेत.

महाराष्ट्रात सन 2002 सालापासून शासनाने कायम विनाअनुदान तत्वावर कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली. 26 फेब्रुवारी 2014 रोजी अशा कनिष्ठ महाविद्यालयांचा कायम शब्द वगळून, माध्यमिक शाळांच्या धर्तीवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला. याबाबत कार्यवाही म्हणून शासनाने अशा महाविद्यालयांचे मूल्यांकनही केले. या प्रक्रियेला 4 वर्षे उलटली. महाविद्यालयांना अनुदान तर दूरच मूल्यांकनपात्र यादी घोषित करण्याचाही मोठेपणा दाखवला नाही. कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या शिक्षकांनी आतापर्यंत 205 आंदोलने केली. परंतु शासनाने कोरडी सहानुभूती व पाळण्याची सक्ती नसते, अशा मौखिक आश्वासनांशिवाय काहीही दिले नाही. अशा महाविद्यालयांत 15 वर्षांपासून विनावेतन ज्ञानदानाचे काम करणार्‍या शिक्षकांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीचे संकट कोसळले आहे. पगार नसल्यामुळे यातील काही शिक्षकांची लग्ने जमेनासी झाली आहेत. अनेकांना चरितार्थ चालवण्यासाठी शाळा सुटल्यावर चक्क रिक्षा चालवावी लागत आहे. तर काही कपडे शिवण्याचा व्यवसाय, मजूरी करावी लागत आहे.