Mon, Nov 19, 2018 09:02



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महिला निवारण कक्षात नाचल्या नंग्या तलवारी

महिला निवारण कक्षात नाचल्या नंग्या तलवारी

Published On: Jun 19 2018 3:19PM | Last Updated: Jun 19 2018 3:07PM



उल्हासनगर : वार्ताहर

उल्हासनगर परिमंडळ चार उपायुक्त कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या महिला तक्रार निवारण केंद्रात नवऱ्या मुलाची हत्या करण्यासाठी मुलीकडच्यांनी थेट तलवारी काढल्याचा प्रकार घडला आहे. मात्र मध्यवर्ती पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पाचारण करीत मुलगा आणि मुलीकडील मिळून नऊ जणांना अटक केली आहे. 

बदलापूर, शिरगावमध्ये विकास विश्वनाथ शिरसाठ हा राहतो. विकासचा २०१६ मध्ये नेहा हिच्याशी आंतरजातीय विवाह झाला होता. काही कौटुंबिक कलाहांमुळे त्याने उल्हासनगर महिला तक्रार निवारण कक्षात मे २०१८ मध्ये त्याची पत्नी नेहा, सासरा विनायक चांगले, सासू मंगल चांगले, मेहुणा समीर चांगले यांच्या विरोधात तक्रार केली होती. याबाबतची सुनावणी दोनदा बोलावण्यात आली मात्र मुलगी ही विकासकडे नांदण्यास तयार नव्हती. सोमवारी दुपारी सुनावणीसाठी दोघेही पती पत्नी समोर आले मात्र त्यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद ऐकून दोन्ही बाजूचे चौदा ते पंधरा इसम महिला तक्रार निवारण कक्षात घुसले आणि आपापसात जोरदार भांडण करू लागले. त्यांना महिला तक्रार निवारण कक्षात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस नाईक सुलक्षणा चंदनशिवे, महिला पोलीस उपनिरीक्षक शेलार, महिला पोलीस शिपाई जोशी, समुपदेशिका संजीवनी भानुशाली यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता या इसमांनी त्यांना धक्का बुक्की करीत शिवीगाळ केली. यावेळी महिला पोलीस शिपाई जोशी यांनी एका इसमाच्या हातातील चाकू हिसकावून घेतला, या धक्का बुक्कीत जोशी आणि भानुशाली यांच्या हाताला मार लागला. ही आरडा ओरड आणि शिवीगाळ बाजूलाच असलेल्या मध्यवर्ती पोलीस ठाणे,अतिक्रमण कक्ष आणि  नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या पोलिसांना ऐकू आली. त्यांनी वाद घालणाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चार ते पाच जण पोलिसांना धक्का मारून पळून जाण्यात यशस्वी झाले. परंतु धुळे येथून आलेले सचिन मुर्तडकर, योगेश मुर्तडकर, राहुल मुर्तडकर, मुंबईस्थित महेश करपे, बदलापूर येथे राहणारे समीर चांगले, विकास शिरसाट, आकाश शिरसाट, बंडू शिरसाट आणि अमोल शिरसाट यांच्या मुसक्या आवळण्यात मध्यवर्ती पोलिसांना यश आले.

याबाबत  मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस यांनी सांगितले की तीन तलवारी, तीन चाकू आणि एक चार चाकी मध्यवर्ती पोलिसांनी पंचनामा करून आरोपींकडून ताब्यात घेतली आहे. वेळीच मध्यवर्ती पोलिसांनी या नऊ आरोपीना हत्यारांसह ताब्यात घेतले नसते तर मोठी रक्तरंजित घटना महिला तक्रार निवारण कक्षात घडली असती. मात्र यामुळे महिला तक्रार निवारण कक्षातली पती पत्नीतील भांडण टोकाला जाऊन तलवारीही निघू शकतात याचा प्रत्यय तेथील समुपदेशिकांना आला आणि त्या पोलीस महिलांनाच आता सुरक्षेची गरज भासू लागली आहे हे स्पष्ट होते.