Sun, Aug 25, 2019 03:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभा, विधानसभा स्वबळावर : उद्धव ठाकरे 

लोकसभा, विधानसभा स्वबळावर : उद्धव ठाकरे 

Published On: Jan 23 2018 1:50PM | Last Updated: Jan 24 2018 1:53AMमुंबई : पुढारी ऑनलाईन 
आगामी २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याचे आज, शिवसेने पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आज, मुंबईत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात विविध ठरावांनंतर उपस्थितांना संबोधित करताना, उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांचा समाचार घेतला. गोहत्या बंदीसारखीच थापाबंदी करा, असा टोलाही त्यांनी लगावला.  

शेतकऱ्यांचा हितासाठी सरकारने स्वामीनाथन समितीच्या शिफारसी मंजूर करण्याचा ठराव, कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, 'शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आणि त्याला संपूर्ण कर्जमुक्त करणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची जाहिरातबाजी सरकारकडून केली जात असली, तरी प्रत्यक्ष लाभार्थी किती आहेत. याविषयी शंका आहे. मुळात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची मूळ मागणी शिवसेनेचीच आहे.'

ते म्हणाले, 'शिवसेना प्रमुखांनी संघटना तयार केली नाही तर विचार दिला. त्यांच्याविचारांवर चालणारा शिवसैनिक हा हात वर करणारा नव्हे तर मुठ आवळणारा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने असलेल्या या मैदानावर आपण कार्यकारिणीची बैठक घेत होता. आज सरदार पटेल असते तर काश्मीर प्रश्न शिल्लक नसता. पण, सध्या निवडणुका आल्या की काही पक्षांना पाकिस्तानची आठवण येते. गुजरात निवडणुकीत पाकिस्तानला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली.' ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून सत्तेत येता, भाजपबद्दल जनतेचे मत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 

गडकरींनी नौदलानिषयी केलेल्या वक्तव्याचाही उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, 'नौदलात जे शौर्य आहे, ते तुमच्या ५६ इंच छातीत नाही आणि शौर्य नसेल, तर ५६ इंचांची छाती काही कामाची नाही. मुळात जर तुम्ही नौदलावर अशी टीका करत असाल, तर तुम्हाला सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेण्याचाही अधिकार नाही.' 

पक्षाचा निवडणुकांचा अजेंडा स्पष्ट करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना निवडणूक लढवणार आहे. आतापर्यंत हिंदू मतांमध्ये फूट नको म्हणून अन्य राज्यात निवडणूक लढवली नाही. हिंदुत्वाच्या मुद्दयावर यापुढे निवडणूक लढवणार. पंतप्रधान मोदी म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. इतर देशांच्या पंतप्रधानांना घेऊन अहमदाबादऐवजी श्रीनगरच्या लाल चौकात जाऊन तिरंगा फडकवा, आम्हाला तुमचा अभिमान वाटेल.' कोरेगाव-भीमा हिंसाचार विषण्ण करणारी घटना आहे, असे मतही ठाकरे यांनी व्यक्त केले.