Thu, May 23, 2019 14:21
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मतांच्या लाचारीपोटी मराठीचा बळी : शिवसेना 

मतांच्या लाचारीपोटी मराठीचा बळी : शिवसेना 

Published On: Feb 27 2018 11:10AM | Last Updated: Feb 27 2018 11:10AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्‍याच दिवशी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न झाला नाही. त्‍यामुळे सरकारने मराठी भाषेचा आपमान केल्याचा आरोप करत, विरोधकांनी अभिभाषणावर बहिष्कार टाकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली. शिवसेनेनेही यावरून सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘‘अमराठी मतांच्या बळावर मुंबईतील निवडणुका जिंकण्याचा अघोरी प्रयोग मागील दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. त्यासाठी मराठी स्वाभिमानाचा बळी दिला जात आहे. मुख्यमंत्री मुंबईतील कार्यक्रमांत हिंदीत बोलण्याचा अट्टहास धरतात, मराठी टाळतात.’’ असा आरोप सामनामधून करण्याजत आला आहे. 

'महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायरीवर आज मराठी भाषा अडखळली. मराठी अनुवादकास सुरक्षारक्षकांनी पायरीवर अडवल्याने राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद झाला नाही व राज्यपालांचे इंग्रजी भाषण अनेकांच्या डोक्यावरून गेले. या चुकीला माफी नाही, पण तरीही मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली. निदान ‘मराठी’ अस्मितेच्या बाबतीत तरी मुख्यमंत्र्यांवर असे प्रसंग येऊ नयेत. राज्यकारभार किती ढिसाळ, गचाळ व बेफिकिरीने सुरू आहे त्याचाच हा उत्तम नमुना आहे. ‘जय महाराष्ट्र’तून मराठीस वगळले तर काय होणार? मराठी भाषा दिवस हा एक सरकारी उपचार ठरू नये,' अशी टीका उद्धव यांनी केली. 

‘‘महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी सुरू झाले. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांचे भाषण इंग्रजीत सुरू होताच त्याचा मराठी अनुवाद ऐकण्यासाठी आमदारांनी टेबलावरचे ‘इअर फोन’ कानास लावले तेव्हा त्यांना धक्काच बसला. कारण राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवादच ऐकू येत नव्हता. ऐकू येईल तरी कसा? कारण त्यासाठी नेमलेला अनुवादक जागेवर पोहोचलेलाच नव्हता. त्यासाठी जे कोणी जबाबदार असतील ते असतील, पण मराठी राज्यातच राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद न होण्याचा लाजिरवाणा प्रकार राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला. अर्थात हा अनुवाद गुजरातीत सुरू होता असा जो आरोप केला जातोय तो खरा नाही. मात्र मराठी अनुवादक पोहोचले नाहीत, आमदारांची गैरसोय झाली आणि महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकेल असा प्रकार घडला हे सत्य आहे. संपूर्ण राज्याचे इंग्रजीकरण झाले व ‘मराठी’त अनुवाद झाला नाही तरी कोण विचारतेय, या एका बेफिकिरीतून हा प्रकार घडला आहे. मराठी राजभाषेची ही अवहेलना आहे व झाल्या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितली आहे. दोषींवर कारवाई करू, असेही त्यांनी सांगितले. पण मराठी भाषा व महाराष्ट्र अस्मितेच्या बाबतीतच असे ‘दोष’ का निर्माण होतात?’’ असा प्रश्न उध्दव यांनी उपथित केला आहे.