Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाणे आयुक्तांसंदर्भात क्लिपमध्ये दाखवण्यात आलेला प्रकार खोटा

ठाणे आयुक्तांसंदर्भात क्लिपमध्ये दाखवण्यात आलेला प्रकार खोटा

Published On: Dec 24 2017 1:45AM | Last Updated: Dec 24 2017 1:17AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी 

पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या विरोधात व्हायरल झालेल्या क्लिपमधील मुलगी आणि तिचे संपूर्ण कुटुंबीयच शनिवारी संध्याकाळी अचानकपणे ठाण्यात येऊन त्यांनी या क्लिपसंदर्भात मोठा खुलासा केला. क्लिपमध्ये दाखवण्यात आलेला प्रकार खोटा असल्याची माहिती या मुलीने पोलिसांना दिली आहे. आपले घर जेव्हा तोडले त्यावेळी काही अज्ञात व्यक्ती ज्यांना आपण ओळखत नाही अशांनी माझ्या घरी येऊन मला बोलण्यास भाग पाडले असल्याचा खुलासा या मुलीने केला आहे. घर तुटल्याने मी आणि माझे सर्व कुटुंबीय सुरतला गेलो होतो, असे या मुलीचे म्हणणे आहे. 

एक महिन्यापूर्वी ही क्लिपिंग सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली होती. त्यानंतर ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयात पत्र देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. खुद्द पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांच्याकडे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता. घर तोडल्यानंतर मुलगी तसेच तिचे सर्व कुटुंबीयच गायब झाले होते. तब्बल एक महिन्यानंतर क्लिपमधील मुलगी तसेच तिचे कुटुंबीय ठाण्यात आले ते थेट उपोषणाच्या जागेवर. असा कोणताच प्रकार झाला नसल्याची माहिती तिने उपोषण करत असलेल्या कार्यकर्त्यांना दिली आहे. 

ही माहिती देत असतानाच पोलीस घटनास्थळी येऊन चौकशी करण्यासाठी तिला खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात घेऊन गेले. मुलीकडे अधिक चौकशी केल्यानंतर असा कोणताच प्रकार झाला नसल्याचे तिने पोलीस जबाबात म्हटले आहे. ज्यावेळी घर तोडले त्याच वेळी आम्ही याची तक्रार मानपाडा पोलीसांत केली होती. घर कोणी तोडले आम्हाला माहित नाही. ज्यावेळी हा प्रकार झाला त्यावेळी काही अज्ञात लोक तेथे येऊन मला प्रश्न विचारू लागले . चित्रीकरण करणारे कोण होते हेही मला माहित नाही. घर तुटल्याने आम्ही थेट सुरतला गेलो. त्यानंतर ठाण्यात असा काही प्रकार सुरु असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर असं काही घडलेच नाही हे सांगण्यासाठी आम्ही ठाण्यात आलो. जे आमच्या बाजूने उपोषणाला बसले आहेत त्यांना असा काही प्रकार घडला नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असेही या मुलीने सांगितले.