Sat, May 30, 2020 05:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गृहीणीने चोरांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्‍यात 

गृहीणीने चोरांना पकडून दिले पोलिसांच्या ताब्‍यात 

Published On: Mar 05 2018 8:04PM | Last Updated: Mar 05 2018 8:04PMनालासोपारा : वार्ताहार

नालासोपारा येथील गृहिणीने धाडस दाखवून घरात शिरलेल्या तीन चोरांपैकी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्‍यात दिले. नालासोपारा पश्चिमेच्या पाटणकर पार्क येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. 

नालासोपारा येथील पाटणकर पार्क मधील तुस्कन टॉवर या इमारतीत रेखा सॅलियन नावाच्या गृहिणी राहतात. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास त्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी गेल्या होत्‍या. अर्ध्या तासाने त्या घरात आल्या तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आढळले. त्या दार ढकलून आत गेल्या तर तीन चोरटे हातात शस्त्र घेऊन असल्‍याचे दिसले. घरात चोर आल्याचे पाहून त्या काही क्षण घाबरल्या. त्या चोरांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांना गप्प राहण्यास सांगितले. मात्र, सॅलियन आणि त्यांच्या १४ वर्षीय मुलाने या चोरांशी झुंज देत झटापट केली. मदतीसाठी त्यांनी धावा केला. अचानक झालेल्या या प्रतिकाराने तिघे चोर गांगरून गेले. सॅलियन यांनी मोठ्या हिमतीने एकाला पकडून ठेवले. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावत आले. याच इमारतीच्या शेजारी नगरसेवक अतुल साळुंखे यांचे कार्यालय आहे. त्‍यांनी घटनास्‍थळी धाव घेत पळून जाणाऱ्या अन्य चोराला पकडले. या दोन्ही चोरांना नागिरकांना चोप देऊन नालासोपारा पोलिसांच्या ताब्‍यात दिले. या चोरांकडे दरोडा घालण्यासाठी लागणारी कटावणी, कोयता तसेच चोरी केलेले घरातील सोन्याचे दागिने आदी मुद्देमाल आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. या दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे नालासोपारा पोलिसांची पेट्रोलिंग सुरू नसल्याचा आरोपही येथील नागरिकांनी केला असून, गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक किंवा धाक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

रेखा सॅलियन आणि त्यांच्या मुलाने दाखवलेल्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे. नागरिकांनी दोन चोरांना पकडून आमच्या ताब्यात दिले आहे. आम्ही त्यांना वैद्यकीय उपचारांसाठी पाठवले आहे. नंतर त्यांच्यावर तपास करून गुन्हे दाखल केले जातील असे नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी सांगितले.