Tue, May 26, 2020 14:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मीरा-भाईंदरमध्ये आणखी दोन कोरोनाबाधित; रुग्णांची संख्या ८ वर

मीरा-भाईंदरमध्ये आणखी दोन कोरोनाबाधित

Last Updated: Apr 04 2020 7:29PM

मीरा-भाईंदर- कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसराचे पालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.भाईंदर : पुढारी वृत्तसेवा

मीरा-भाईंदर शहरात शनिवारी आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून ते भाईंदर पश्चिम व पुर्वेकडील  असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्तापर्यंत शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८ वर आली असली तरी कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांमुळे त्यात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालिकेकडून अशा व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.

भाईंदर पश्चिमेकडील नारायण नगर येथील एका ६० वर्षीय महिला न्युमोनियाने त्रस्त होती. तिच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तिची खासगी रुग्णालयात वैद्यकीय चाचणी घेतली असता त्यात ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे तिच्यासह तिच्या कुटुंबातील तीन सदस्यांना पालिकेच्या आयसोलोशन कक्षात दाखल करण्यात आले. तिच्यासह तिच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमुने पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविले आहे. तसेच भाईंदर पुर्वेकडील एस. व्ही. रोड परिसरात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

तत्पुर्वी ती व तिचा मुलगा २३ मार्च रोजी तिचा पती कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असताना तेथे रहात होते. दरम्यान तेथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना २८ मार्च रोजी रुग्णालयाने तेथेच उपचारासाठी दाखल करुन घेतले. त्यांच्या वैद्यकीय चाचणीत पती व मुलगा कोरोनाबाधित नसल्याचे स्पष्ट झाले तर ती महिला कोरोनाबाधित असल्याचे ३० मार्च रोजीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले. त्याचा अहवाल पालिकेला नुकताच प्राप्त झाल्याने शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८ वर आली आहे. शनिवारी नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेल्या परिसराचे पालिकेकडून निर्जंतुकीकरण करण्यात आले असून हा परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले.