Sun, Nov 18, 2018 07:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad ›

भिवंडीत दोन्ही हात कापलेला चिमुरडीचा मृतदेह आढळला
 

भिवंडीत दोन्ही हात कापलेला चिमुरडीचा मृतदेह आढळला
 

Published On: Apr 05 2018 2:24AM | Last Updated: Apr 05 2018 1:43AMभिवंडी : वार्ताहर 

भिवंडी शहरातील रोशन बाग परिसरातील झुडपात एका चार वर्षीय चिमुरडीचा दोन्ही हात कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पायल प्रसाद असे या चिमुरडीचे नाव आहे. 

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, पायल ही भिवंडीतील टावरे कंपाऊंड परिसरातील गौतम चाळीमध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहत होती. ती घरानजीक असलेल्या मैदानात 1 एप्रिल रोजी खेळायला गेली होती. मात्र ती घरी परतलीच नसल्याने तिच्या आई-वडिलांनी आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. यामुळे तिचे वडील महादेव प्रसाद यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात 2 एप्रिल रोजी पायल बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून भोईवाडा पोलिसांनी तपासही सुरू केला. दरम्यान, पायलाचा तिच्या घरापासून 300 मीटर अंतरावर असलेल्या रोशन बाग परिसरातील झुडपात दोन्ही हात नसलेल्या अवस्थेत मृतदेह बुधवारी दुपारच्या सुमाराला आढळून आला. 

या घटनेची माहिती मिळताच भिवंडीचे प्रभारी पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज, भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय भिसे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करत पायलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. चिमुरड्या पायलची बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून भोईवाडा पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.