होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये पकडला 15 टन गोमांस भरलेला ट्रक

कल्याणमध्ये पकडला 15 टन गोमांस भरलेला ट्रक

Published On: Jun 21 2018 1:35AM | Last Updated: Jun 21 2018 12:30AMडोंबिवली : वार्ताहर

कल्याण शहरातून तब्बल 15 टनाहून अधिक  गोमांसाची वाहतूक  करणारा ट्रक पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना यश आले आहे. याप्रकरणी वसीम लुतीफ खान (32), मोहंमद अन्वर मोहंमद हुसेन (19) (दोघे रा. मेहवी नगर, सलामतबाद चौक, मालेगाव, नाशिक) आणि अमजद कयुम खान (28, रा. रेल्वे कॉलनी, सिन्नर फाटा, नाशिक) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त केलेले हे सर्व मांस पोलिसांनी ताब्यात दिल्यानंतर केडीएमसीने ते आधारवाडीच्या डम्पिंग ग्राऊंडवर गाडले आहे. अटकेतील तिघांना गुरुवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

बुधवारी सकाळी कल्याणमधील सर्वोदय मॉल जवळून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे काही कार्यकर्ते जात असताना दुर्गंधी पसरवत एक ट्रक (एम एच 17 टी 2751) बाजूने जाताना दिसला. या कार्यकर्त्यांनी इतर कार्यकर्त्यांशी संपर्क साधून या ट्रकचा पाठलाग सुरू केला. पत्री पुलाखाली वाहतूक पोलिसांची तपासणी सुरू असताना देखील हा ट्रक तपासणी न करता सोडण्यात आला. कल्याण-शिळ मार्गावर पिसवलीजवळ सदर ट्रक येताच हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी सदर ट्रक पकडून मानपाडा पोलीस ठाण्याकडे नेण्यात आला. या प्रकरणी हर्षल साळवे (28) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस ठाण्याच्या मागच्या रस्त्याला पार्क केलेल्या या ट्रकमधील मांस सडल्याने प्रचंड दुर्गंधी सुटली होती. हे मांस मालेगावहून तळोजा एमआयडीसीतील एका फॅक्टरीमध्ये नेण्यात येणार होते.