Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंगावर झाड पडून बाईकस्वार गंभीर जखमी

अंगावर झाड पडून बाईकस्वार गंभीर जखमी

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 17 2018 12:56AMठाणे : प्रतिनिधी 

अंगावर झाड पडल्याने अ‍ॅड. किशोर पवार यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पाचपाखाडी परिसरात अशाच प्रकारची घटना घडली. या दुर्घटनेत प्रशांत धबाले (26) या तरुणाच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी कौशल्य हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शहरातील खड्ड्यांप्रमाणेच धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

कल्याणमध्ये खड्ड्याने आतापर्यंत पाच बळी घेतले असून ठाण्यात देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र, ठाण्यात खड्ड्यांबरोबरच आता धोकादायक झाडांची समस्या देखील गंभीर बनली आहे.  गेल्या 15 दिवसांमध्ये झाडे पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. 

काही महिन्यांपूर्वीच मुलीला शाळेत सोडून परत घरी येणार्‍या  अ‍ॅॅड. किशोर पवार यांच्या अंगावर झाड पडून त्यांचा मृत्यू झाला होता. पवार यांच्या मृत्यूमुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. अखेर पवार यांच्या पत्नीला ठाणे महापालिकेत नोकरी दिल्यानंतर हे प्रकरण निवळले. 

या घटनेची पुनरावृत्ती सोमवारी घडली. साकेत येथे राहणारा प्रशांत काही कामानिमित्त पाचपाखाडी परिसरात आला होता. जनसेवा बँकेजवळून बाईकवरून जात असताना परिसरातील मोठे झाड त्याच्या अंगावर पडले आणि तो गंभीर जखमी झाला. त्याच्या बाईकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहरात झाडे पडण्याचे प्रमाणात वाढले असून वृक्षप्राधिकरण विभाग मात्र याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.