Tue, Nov 20, 2018 11:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अनुवादक न पोहोचल्याने राज्यपाल नाराज

अनुवादक न पोहोचल्याने राज्यपाल नाराज

Published On: Feb 27 2018 1:59AM | Last Updated: Feb 27 2018 1:19AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणावेळी मराठी अनुवादक पोहोचलेच नसल्याने सत्ताधारी आणि विधिमंडळ प्रशासनाला विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, अनुवादक का पोहोचले नाहीत आणि त्यात चूक कोणाची, याची चर्चा आता सुरू झाली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्‍त करीत कारवाई करण्याचे निर्देश दिल्याने या प्रकरणात कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणाचा मराठी अनुवाद दरवर्षी प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे हे करीत असतात. मात्र, ते तब्येतीच्या कारणास्तव उपलब्ध नसल्याने दुसरे वृत्तनिवेदक श्रीराम केळकर यांना अनुवादक म्हणून निवडण्यात आले होते. मात्र, ते अभिभाषणाला पोहोचू शकले नाहीत. आता ती चूक कोणाची, याची चौकशी सुरू झाली आहे. अनुवादक निश्‍चित करून त्यांना विधानभवनपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माहिती व जनसंपर्क खात्याची आहे. त्यानंतर त्यांना अनुवादनासाठी असलेल्या केबिनपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही सुरक्षा यंत्रणा आणि विधिमंडळ प्रशासनाची आहे. 

केळकर हे विधिमंडळात आले तरी त्यांना केबिनचा ठावठिकाणाच लागला नाही. ते अनुवादनाची केबिन शोधत बसले, असे सांगितले जात आहे. तर, कोणी ते उशिरा आल्याचेही सांगत आहेत. मात्र, या सार्‍या प्रकारात हलगर्जीपणा झाल्याने राज्यपालांच्या अभिभाषणात गदारोळ उडाला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याची विनंती स्वत: मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात केल्याने कारवाई अटळ आहे.