Fri, Mar 22, 2019 05:34
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंधेरीत वाहतूक पोलिसाला मारहाण 

अंधेरीत वाहतूक पोलिसाला मारहाण 

Published On: Sep 03 2018 1:40AM | Last Updated: Sep 03 2018 1:12AMमुंबई : प्रतिनिधी

अवैध प्रवासी घेऊन जाणार्‍या टॅक्सीचालकावर कारवाई करताना टॅक्सीतील तीन प्रवाशांनी गोरख राजाराम लोखंडे या पोलीस शिपायाला धक्काबुक्की, शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शनिवारी अंधेरीतील गोल्डस्पॉटजवळ घडली. याप्रकरणी अंधेरी पोलिसांनी प्रशांत अरुण तिवारी, आशिष अनिल भट, प्रेम मधुकर केणी या तिन्ही प्रवाशांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून अटक केली.

तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सहार वाहतूक चौकीत गोरख राजाराम लोखंडे हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी नऊ वाजता ते ड्युटीवर हजर झाल्यानंतर त्यांना गोल्डस्पॉट जंक्शनजवळ कर्तव्य बजवण्यास सांगण्यात आले होते. तिथे त्यांना एका टॅक्सीतून सहा प्रवासी जात असल्याचे दिसले.

त्यांनी टॅक्सीचालकास थांबवून चारपेक्षा जास्त प्रवासी घेतल्याप्रकरणी कारवाई करण्यास सुरुवात केली. तीन प्रवाशांनी त्यांनाच जाब विचारून  शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रवाशांना शांत राहण्याचे आवाहन करूनही ते तिघेही त्यांना मारहाण करू लागले. यावेळी इतर पोलिसांनी तिथे धाव घेतली.  तिन्ही प्रवाशांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना नंतर अंधेरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी गोरख लोखंडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी 353, 332, 504, 34 भादंवि कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.