Sat, Mar 23, 2019 18:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यभरात तब्बल ३८ लाख नोंदणीकृत बेकार

राज्यभरात तब्बल ३८ लाख नोंदणीकृत बेकार

Published On: Apr 23 2018 1:58AM | Last Updated: Apr 23 2018 1:50AMमुंबई : प्रतिनिधी

सुशिक्षित बेकारीचा आलेख दिवसेंदिवस चढत असून, राज्यातील नोंदणीकृत बेकारांची संख्या 38 लाखांच्या वर पोहोचली आहे. यामध्ये 9 लाख 44 हजार महिला उमेदवार आहेत. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार राज्यात सुशिक्षित बेकारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ असली तरी त्या तुलनेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात सरकारला अपयश आल्याचे विदारक चित्र मांडण्यात आले आहे.

नोंदणीकृत बेकारांत 18 टक्के पदवीधर, 6 टक्के पदविकाधारक, 3 टक्के पदव्युत्तर पदविकाधारक तर दहावी/बारावी उत्तीर्ण 28 टक्के सुशिक्षित बेकार राज्यात आहेत. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालयाकडील नोंदणीनुसार मागील वर्षी 5 लाख 39 हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. नोंदणी न झालेल्यांची संख्या त्याहून अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारी कार्यालयातील नोकरभरतीवर असलेल्या निर्बंधामुळे नोंदणी केलेल्या सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नाही, खासगी आस्थापनांमध्ये अलीकडच्या काळात नोकरीच्या ज्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य पदवीधर किंवा पदव्युत्तर उमेदवारांकडे नसल्याने बेकारांच्या संख्येत घट होण्याऐवजी ती वाढतच आहे.

90 च्या दशकात नागपूर येथे विधिमंडळावर राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बेरोजगारांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. जवळपास 27 लाख मोर्चेकरी त्यात सहभागी झाले होते. त्यानंतर गेल्या 25 वर्षांच्या कालखंडात हा प्रश्‍न घेऊन ना मोर्चा झाला, ना आंदोलन. 

Tags : Mumbai, 38 lakh, registered, unemployed, Mumbai news,