Mon, Mar 18, 2019 19:27होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पदवीधर, शिक्षकसाठी उद्या मतदान

पदवीधर, शिक्षकसाठी उद्या मतदान

Published On: Jun 24 2018 1:34AM | Last Updated: Jun 24 2018 1:07AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि शिवसेना समोरासमोर आल्याने त्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चारही मतदारसंघात चुरस  दिसून येत आहे.  मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांना तिकीट नाकारले असून त्यांच्याऐवजी अनपेक्षितपणे विभागप्रमुख विलास पोतनीस यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. 

भाजपने शिवसेनेच्या विरोधात अ‍ॅड. अमितकुमार मेहता यांना उमेदवारी दिली आहे. पोतनीस यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या असून अ‍ॅड. मेहता यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी रणनीती आखली आहे. या व्यतिरिक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर शेतकरी कामगार पक्षाचे राजेंद्र कोरडे हे देखील आहेत. मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार यांनीही प्रचारात मेहनत घेतली आहे.  

कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढत रंगली. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादीने त्यांच्यासमोर ठाणे महापालिकेतील नगरसेवक नजीब मुल्ला यांना रिंगणात उतरविले आहे. शिवसेनादेखील या निवडणुकीत ताकदीने उतरली आहे.

माजी महापौर संजय मोरे यांच्यासारखा उमेदवार शिवसेनेने रिंगणात उतरविला आहे. मोरे यांच्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर नजीब मुल्ला यांच्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. भाजपची धुरा रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर आहे.

मुंबई शिक्षक या मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार कपिल पाटील निवडणूक रिंगणात आहेत. हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भाजपनेही जोर लावला आहे. भाजपने या मतदारसंघातून अनिल देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर आहे. तर शिवसेनेने या मतदारसंघातून शिवाजी शेंडगे यांना उमेदवारी दिली आहे. 

नाशिक शिक्षक मतदासंघात भाजपचे अनिकेत पाटील, शिवसेनेचे किशोर दराडे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, टीडीएफचे भाऊसाहेब नारायण कचरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंब्यावर संदीप बेडसे हे निवडणूक रिंगणात आहेत.