Thu, May 28, 2020 13:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विखेंसह काँग्रेसचे काही आमदार उद्या भाजपमध्ये

विखेंसह काँग्रेसचे काही आमदार उद्या भाजपमध्ये

Published On: Jun 12 2019 1:19AM | Last Updated: Jun 12 2019 1:19AM
मुंबई : उदय तानपाठक

होणार, होणार म्हणून गाजत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी अखेर 14 जूनचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील  यांच्यासह भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या एकाचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विखे यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

मंगळवारी दिवसभर विस्ताराच्या हालचालींनी वेग घेतला. भाजपमधील अनेक इच्छुक आमदारांसह बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या मुलाला भाजपच्या तिकिटावर खासदार केले आणि त्यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा सुरू झाली. आता त्यांचा पक्षप्रवेश होणार असून, लगेचच मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. 

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याबरोबर काँग्रेेसमधील काही आमदारही भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांना कसे सामावून घ्यायचे आणि काय देता येईल, याबद्दल आज मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांचे विश्‍वासू मंत्री गिरीश महाजन हेही या बैठकीस उपस्थित होते. 

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्यही यावेळी उपस्थित होते. मंत्रिमंडळातील सात जागा रिक्त असून, गिरीश बापट खासदार झाल्याने आणखी एक म्हणजे आठ जागा रिक्त आहेत. यात शिवसेनेच्या  वाट्याला किती मंत्रिपदे येतील हे अजून ठरलेलेनाही. मात्र, शिवसेनेचा एक आमदार मंत्रिमंडळात समाविष्ट होईल, असे सूत्रांनी सांगितले.

या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे सहा आणि शिवसेनेचा एक मंत्री शपथ घेणार आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाचीही चर्चा आहे. याखेरीज कोल्हापूर जिल्ह्यातून शिवसेनेचे दोन खासदार विजयी झाल्याने तेथील आमदाराला मंत्रिपदाचे बक्षीस उद्धव ठाकरे देणार का? याबद्दल उत्सुकता आहे, असे झाल्यास आ. राजेश क्षीरसागर यांचा समावेश होऊ शकतो. औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे किंवा प्रशांत बंब, बुलडाण्यातील जळगाव-जामोदचे भाजप आमदार संजय कुटे यांनाही मंत्रिपदाची लॉटरी लागेल, असा अंदाज आहे. मोहिते-पाटील यांच्या घरात विजयसिंह मोहिते-पाटील किंवा रणजितसिंह मोहिते-पाटील या दोघांपैकी एकाला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.