Sat, Jul 20, 2019 23:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नारळ, फुले वाहून ‘ते’ करायचे घरफोडी!

नारळ, फुले वाहून ‘ते’ करायचे घरफोडी!

Published On: Feb 04 2018 10:11AM | Last Updated: Feb 04 2018 10:11AMमुलुंड: प्रतिनिधी

देवाला कौल देऊन घरफोड्या करणार्‍या एका टोळीला नवघर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलुंड विभागात चोरीच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश केला. घरफोडीच्या ठिकाणी ही टोळी नारळ, फुले ठेवायचे. या टोळीत चौघांचा समावेश असून यातील दोघेजण मूळचे तमीळनाडूचे आहे. मोहन उर्फ निर्मन आरमोगम शेट्टी (25, रा. नाहूर), शक्ती वेल निर्मन (41, रा.  नाहूर), प्रवीण भीमराव गायकवाड (25, रा. कळवा), यशवंत बबन मोहिते (20, रा. दिवा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या तीन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. 

या टोळीमध्ये महाराष्ट्रातील काही जणांचा समावेश असला तरी टोळीचा म्होरक्या हा तमिळ आहे. ठाण्यातील कळवा, दिवा आणि मुंबईतील कांजूरमार्ग, कांदिवली आदी परिसरात या टोळीचे सदस्य  कार्यरत आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी चार सुरे, दोन स्क्रू ड्राईव्हर, एक स्प्रिंग पाना, दोन कटावण्या, चार चाव्या, दोन टोप्या असे घरफोडी करताना ते परत असे साहित्य जप्त केले. नवघर पोलीस  ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माधव मोरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक प्रताप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने, सहाय्यक पोलीस  निरीक्षक भरत जाधव आणि त्यांच्या  पथकाने ही यशस्वी कारवाई केली. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

नारळाची शेंडी ज्या दिशेला जाईल तिकडे चोरी घरफोडीच्या आधी ही टोळी प्रथम तेथील एखाद्या  देवळात जायची. पिवळी फुले आणि नारळ वाहून रिक्षाने एका चौकात यायची. रस्त्यावर  फुले वाहून हातातील नारळ जमिनीवर तीन वेळा फिरवायची. नारळाची शेंडी ज्या दिशेकडे जाईल, त्या  रस्त्याने जाऊन एकांतात असलेल्या बंद घराची निवड करून घरफोडी करायची. घरफोडीच्या जागेवरही फुले वाहिली जायची. त्यांच्या या घरफोडीच्या पद्धतीने पोलीसही काहीकाळ चकित झाले. चोरी  किंवा कोणतेही गुन्हे करणारे सहसा अंधश्रद्धेला थारा देत नाहीत. मात्र, या टोळीची चोरीची पद्धत नक्कीच चर्चेचा विषय आहे.