होमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकाच नंबरचे तिकीट लागले चक्‍क तिघांना

एकाच नंबरचे तिकीट लागले चक्‍क तिघांना

Published On: Jun 13 2018 1:49AM | Last Updated: Jun 13 2018 1:30AMविरार : वार्ताहर

नालासोपारा येथील भाजी विक्रेता सुहास कदम याचे नशिब मंगळवारी फळफळता  राहिले. नेहमीप्रमाणे त्याने महाराष्ट्र राज्य लॉटरीचे तिकीट खरेदी केले आणि त्याला 1 कोटी 11 लाखांचे बक्षीस लागल्याचे समजले. एवढी मोठे बक्षीस जिंकल्यानंतर सुहासचा आनंद गगनात मावेनासा झाला. बक्षिसाची रक्कम घेण्यासाठी तो लॉटरीच्या कार्यालयात गेला आणि त्याने खरेदी केलेले तिकीट बनावट असल्याचे सांगण्यात आले. 

करोडपती व्हायचे स्वप्न एका क्षणात भग्न होत असताना सुरुवातीला त्याचा यावर विश्‍वासच बसला नाही. खात्री करुन घेण्यासाठी त्याने पुन्हा चौकशी केली असता त्याला समजले की, एकूण तिघांना एकाच क्रमांकाचे तिकीट दिले गेले, त्यातील दोन तिकीटे बनावट होती. आणि सुहासने नेमके बनावट तिकीटच खरेदी केले होते. ज्या विजेत्याकडे खरे तिकीट होते त्याला सदर बक्षिसाची रक्कम देण्यात आली आहे. याप्रकरणी फसवणूक झाल्याबद्दल सुहास कदम याने कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. लॉटरी विक्रेता आणि अन्य विजेत्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अधिकृत लॉटरी तिकिटांवर बारकोड असतो. तो बारकोड कॉपी केला जाऊ शकत नाही. तरीही बनावट तिकिटे तयार करून विकली जातात आणि लोकही त्या तिकिटांना भुलतात, असे लॉटरी विभागातील अधिकार्‍याने सांगितले.