Wed, Jul 17, 2019 07:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बेस्ट बसमध्ये पुन्हा टिक... टिक...

बेस्ट बसमध्ये पुन्हा टिक... टिक...

Published On: Aug 10 2018 1:38AM | Last Updated: Aug 10 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी 

बेस्ट उपक्रमाने ट्रायमॅक्स योजना सुरू करून, स्मार्ट मशीनद्वारे प्रवाशांना तिकीट देण्यास सुरुवात केली. पण ही योजना अवघ्या पाच ते सहा वर्षांत बंद पडली. त्यामुळे आता पूर्वीप्रमाणे बसमध्ये टिक.. टिक.. आवाज ऐकू येत आहे. अचानक जुन्या कागदी तिकीट पुन्हा हातात पडत असल्यामुळे प्रवासीही बुचकळ्यात पडले आहेत. तर दुसरीकडे कन्डक्टरचे कामही वाढले आहे. 

बेस्टने जुन्या कागदी तिकीट बंद करून सहा वर्षांपूर्वी ट्रायमॅक्स कंपनीच्या स्मार्टकार्ड मशीनद्वारे तिकीट देण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रवाशांना आपण कुठून कुठे प्रवास करत आहोत, हे समजू लागले. तर कन्डक्टरचेही काम कमी झाले होते. या एकाच मशीनद्वारे मासिक पास व सवलतीच्या पासची तपासणी होत होती. पण गेल्या दोन वर्षांपासून ट्रायमॅक्सच्या मशीनमध्ये वेळोवेळी बिघाड होऊ लागल्यामुळे बेस्टला जुन्या तिकिटांचा वापर करणे भाग पडले आहे. दरम्यान ट्रायमॅक्स मशीनमध्ये होणारा बिघाड लक्षात घेऊन, ही योजनाच पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे स्मार्टकार्ड मासिक योजनाही बंद झाली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कागदी तिकिटाचे वाटप कन्डक्टर करत असल्याचे दिसून आले. गेल्या पाच वर्षांत कन्डक्टर यांना ट्रायमॅक्सच्या मशीनद्वारे तिकीट देण्याची सवय लागली होती. त्यामुळे अनेक कन्डक्टर जुनी तिकीट पद्धत विसरले आहेत.

जुन्या तिकिटांमध्ये केवळ बस टप्प्यांचा उल्लेख असतो. त्यामुळे नव्या कन्डक्टर यांना टप्प्याचा अंदाज येत नाही. त्याशिवाय तिकिटांची किती विक्री केली याचा प्रत्येकवेळी कागदावर हिशोब ठेवणे भाग पडत आहे. त्यामुळे कन्डक्टरचे काम वाढले आहे. तर दुसरीकडे आपले तिकीट कुठपर्यंत आहे, हे प्रवाशांना समजत नाही. हा तिढा सोडवण्यासाठी बेस्ट प्रशासनाने नवीन योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या निविदा प्रक्रियाही राबवण्यात येणार आहे. पण याला फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नवीन योजना अमलात येण्यास अजून काही कालावधी लागणार असल्याचे परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.