Thu, Jul 02, 2020 23:41होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धुळे, येरवडा, तळोजा तुरुंगातील ३ कैद्यांचा कोरोनाने मृत्यू

धुळे, येरवडा, तळोजा तुरुंगातील ३ कैद्यांचा कोरोनाने मृत्यू

Last Updated: May 26 2020 10:29PM

file photoमुंबई : पुढारी वृत्तसेवा 

राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होत असताना राज्यातील धुळे, येरवडा आणि तळोजा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या ३ कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून धुळे तुरुंगातील आणखी तिघा कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली. 

मुंबई सेंट्रल, आर्थर रोड आणि सातारा येथील तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या विषाणूच्या फैलावापासून इतर रुग्णांची सुटका व्हावी यासाठी त्यांच्या सुरक्षेची शासनाने काळजी घ्यावी, त्यांना सॅनिटायझर, एन ९५ मास्क, सुरक्षित कपडे, साबण मोफत पुरविण्यात यावा,  तुरुंगात डॉक्टरद्वारे कैद्यांची नियमित तपासणी करण्यात यावी, राज्यातील कैद्यांच्या आरोग्याबाबतची माहिती त्यांच्या कुटुंबियांना व वकिलांना देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका पीपल युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज या संस्थेच्या वतीने हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. के. तातेड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

त्यावेळी राज्याचे पोलिस महानिरीक्षक कारागृह सुनील रामानंद यांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. सातारा जिल्ह्यात १० कैद्यांना कोरोना झाला असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच भायखळा येथे एका महिला कैद्याला कोरोनाची लागण झाली असून तिच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका तुरुंग पोलिस कर्मचाऱ्याचाही वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. तर सरकारी वकील काकडे यानी तुरुंगातील सुमारे १४ हजार कैद्यांना सोडण्यासंदर्भात कनिस्ट न्यायालयात अर्ज केल्याची माहिती दिली. याची दखल घेत न्यायालयाने हे अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश कनिस्ट न्यायालयांना दिले. तसेच कोविड कैद्यांना त्यांच्या आरोग्याची माहिती कुटुंबियांना मिळावी म्हणून व्हिडिओ कॉलिंगची सुविधा द्या असे निर्देश  राज्य सरकारला देत या प्रकरणी सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.