होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची धमकी; एक अटकेत 

पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची धमकी; एक अटकेत 

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 1:16AMमुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधानांवर रासायनिक हल्ला करण्याची धमकी देणार्‍या काशिनाथ गुनाधार मंडल या आरोपीला मुंबई सेंट्रल येथून डी. बी. मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. शहरात दंगलीसह जातीय तणाव निर्माण करण्याचा त्याचा कट होता, असे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. 

शुक्रवारी दिल्लीतील एनएसजीच्या कंट्रोल रूमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रासायनिक हल्ला होणार असून त्यांना कोणीही वाचवू शकणार नाही, असे सांगितले होते. थेट पंतप्रधानांवर रासायनिक हल्ल्याची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण सुरक्षायंत्रणा कामाला लागली होती. 

दिल्ली पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. हा कॉल मुंबईतून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून आरोपीचा शोध सुरू केला. चर्नी रोडनंतर ही व्यक्ती मुंबई सेंट्रल परिसरात आल्याची माहिती प्राप्त होताच डी. बी. मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने काशिनाथ मंडल या संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच धमकी दिल्याची कबुली दिली. त्याला मुंबईसह संपूर्ण देशभरात दंगलीसह जातीय तणाव निर्माण करायचा होता. मात्र,  त्याचा हा प्रयत्न फसला.  काही दिवसांनी तो पुन्हा धमकीचा कॉल करण्याच्या प्रयत्नात होता. तशी तयारीही त्याने सुरू केली होती.