Thu, Aug 22, 2019 10:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विमानतळावर हल्ल्याची धमकी देणारा निघाला सुरक्षा अधिकारी

विमानतळावर हल्ल्याची धमकी देणारा निघाला सुरक्षा अधिकारी

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:24AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

इसिस या अतिरेकी संघटनेकडून प्रजासत्ताक दिनी मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील हल्ल्याची धमकी दिल्याचा पत्र लिहिणार्‍या अक्षय शंकर गायकर या 24 वर्षीय सुरक्षा अधिकार्‍याला शनिवारी सहार पोलिसांनी अटक केली आहे. तो भांडुपचा रहिवासी आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने 16 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष म्हणजे अक्षयच्या तक्रारीवरून सहार पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. 

वरिष्ठांकडून कामाबाबत होणार्‍या त्रासाला कंटाळून त्याने हे  कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. अक्षय हा भांडुपच्या ट्रॉली लाईन, श्रीकृष्ण कृपा सोसायटीच्या रूम क्रमांक सहामध्ये राहतो. सध्या तो आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सिक्युरिटी अ‍ॅण्ड इन्टेलिजन्स सर्व्हिसेस, एअर 

कार्गो संकुल येथे सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होता. 29 नोव्हेंबरला तो दिवसपाळीवर ड्युटीवर होता. सायंकाळी चार वाजता कार्गो इमारतीच्या सार्वजनिक शौचालयात अमोल यादव हा कर्मचारी गेला होता. यावेळी त्याला भिंतीवर attack the cargo on 26 jan 2018 and any time by - isis अशा आशयाचा मजकूर असलेला कागद चिकटवला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने ही माहिती तेथील अधिकारी अक्षय गायकवाड यांना दिली होती. या मजकूराने आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेतील अधिकार्‍यांनी धाव घेतली होती. याप्रकरणी सहार पोलिसांनी अक्षय शंकर गायकर याच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली होती. प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर विमानतळ परिसरात प्रवेश दिला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.

या फुटेजमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीची बारकाईने पाहणी करण्यात येत होती. यावेळी तिथे आलेल्या प्रत्येक कर्मचारी आणि अधिकार्‍यांची सहार पोलिसांनी चौकशी सुरू केली होती. त्यात अक्षय गायकर याचाही समावेश होता. चौकशीत तो विसंगत माहिती देत होता. सुरुवातीला त्याने आपला या गुन्ह्यांची काहीही संबंध नाही असे सांगितले.  मात्र, नंतर त्याने ते पत्र लिहिल्याचे सांगितले.