Wed, Jul 24, 2019 08:13होमपेज › Mumbai-Thane-Raigad › यंदाचे साहित्य संमेलन यवतमाळला

यंदाचे साहित्य संमेलन यवतमाळला

Published On: Aug 15 2018 1:59AM | Last Updated: Aug 15 2018 1:59AMठाणे : अनुपमा गुंडे

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा विदर्भाच्या भूमीत म्हणजे यवतमाळ येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने मंगळवारी करण्यात आली. विदर्भ साहित्य संघाची यवतमाळ शाखा आणि डॉ. वि.भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय या संस्थांनी संयुक्तरीत्या या संमेलनाचे यजमानपद स्वीकारले आहे. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यासाठी महामंडळाची सभा 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान यवतमाळ येथे होणार आहे.

 यवतमाळ येथील निमंत्रक संस्थांच्या निमंत्रणावरून अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीने 5 ऑगस्ट रोजी यवतमाळला भेट दिली होती. संमेलनाच्या दृष्टीने संमेलन स्थळ निवड समितीला निमंत्रक संस्थेच्या संबंधित आणि आयोजनासाठी आवश्यक असलेल्या  अनुषंगिक बाबी पूरक वाटल्या. संमेलन स्थळ निवड समितीने 92 वे संमेलन यवतमाळ येथे  घेण्याची शिफारस महामंडळाकडे केल्याने हे स्थळ निश्चित केल्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी दैनिक पुढारीशी बोलतांना सांगितले. संमेलनासाठी निमंत्रक संस्थेची आयोजन क्षमता व सामर्थ्य तसेच संमेलनाशी संबंधित आवश्यक त्या सोयी, सुविधा देण्याची क्षमता यजमान संस्थेकडे असल्याचे संमेलन स्थळ निवड समितीने महांमडळाला सूचित केल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले. 

संमेलनातील ग्रंथप्रदर्शन तसेच संमेलनाचा सविस्तर कार्यक्रम ठरविण्यासाठी महामंडळाच्या ग्रंथ प्रदर्शन समितीची सभा 26 ऑक्टोबर, संमेलन मार्गदर्शन समितीची सभा 27 ऑक्टोबर आणि महामंडळाची सभा 28 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे होणार असल्याची माहितीही डॉ. जोशी यांनी दिली. संमेलन स्थळ निवड समितीत महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, कार्यवाह डॉ. इंद्रजीत ओरके, कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे या पदाधिकार्यासह मराठवाडा साहित्य परिषदेचे डॉ. दादा गोरे, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) विनोद कुळकर्णी, मुंबई मराठी साहित्य संघांच्या डॉ. अनुपमा उजगरे या प्रतिनिधींचा संमेलन स्थळ निवड समितीत समावेश होता.

भिलार नाकारले

92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा जिल्ह्यातील भिलार या पुस्तकांच्या गावी घेण्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी बडोदा येथे झालेल्या 91 व्या संमेलनात केली होती, मात्र  सातारा येथील साहित्य परिषदेने आक्षेप घेतल्याने आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने संमेलनासाठी आलेल्या निमंत्रण स्थळाचा विचार केला.