Wed, Jan 16, 2019 09:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाड एमआयडीसी  पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ 

महाड एमआयडीसी  पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांचा धुमाकूळ 

Published On: Jun 24 2018 2:45PM | Last Updated: Jun 24 2018 2:45PMमहाड : दीपक साळुंखे 

महाड तालुक्यातील  महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिरवाडी मधील दोन दुकाने चोरट्यांच्या टोळीने फोडल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना ताजी असतानाच फार्माची गावातील साई हनुमान मंदिरातून साईबाबांचे मुकुट, चांदीची भांडी आणि  गणपतीची मूर्ती, असा सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिरवाडी बाजारपेठेतील मैत्री कॉम्प्लेक्समधील बागडे बीअर शॉपी व महाडिक किराणा स्टोअर या दुकानात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी रोख रक्कम चोरट्यांना आढळून न आल्याने त्‍यांनी महाड तालुक्यातील पारमाची गावांमधील साईबाबांचे व हनुमानाच्या मंदिरांमधून साईबाबांचे चांदीचे मुकुट, चांदीची भांडी आणि गणपतीची मूर्ती असा सुमारे  ७० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

या दोन्ही घटनांची नोंद महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. महाड एमआयडीसी  पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आबासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

महाड एमआयडीसी  पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिरवाडी पोलिस चौकी गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद असल्याने या ठिकाणी वाहनांची मोडतोड आणि मोटारसायकलची चोरी या घटना घडत आहेत.  त्‍यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण  झाले आहे.