Wed, Aug 21, 2019 14:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दरोडेखोरांचे सॉफ्टटागेर्र्ट आता अंगाडिया 

दरोडेखोरांचे सॉफ्टटागेर्र्ट आता अंगाडिया 

Published On: Jun 02 2018 2:02AM | Last Updated: Jun 02 2018 1:37AMभुलेश्वर, काळबादेवी या परिसरातील अंगाडिया हे आता दरोडेखोरांचे टार्गेट झाले असून दरोड्याच्या घटना वारंवार घडत असल्याने अंगाडियांमध्ये भीतीचे  सावट पसरले आहे. मंगळवारी भुलेश्वर येथे चारजणांच्या टोळीने अंगाडिया कार्यालयात घुसून चॉपर व पिस्तूलाचा धाक दाखवत साडेचौदा लाखांचा दरोडा टाकला. तर  काळबादेवी येथे मंगळवारीच श्रीजी भवन इमारतीत 3 तरुणांनी एका अंगाडियाला घातक शस्त्रांचा धाक दाखवत 20 लाखांची रक्कम लुटली. या दरोड्यात तेथील नोकराचाच हात असल्याचे उघड झाले आहे...

गनपॉईंटवर साडेचौदा लाख लुटले

अंगाडियाच्या कार्यालयात घुसलेल्या चारजणांच्या एका टोळीने चॉपर आणि पिस्तूलचा धाक दाखवून 14 लाख 48 हजार रुपयांची कॅश आणि तीन मोबाईल पळवून नेल्याची घटना मंगळवारी सायंकाळी भुलेश्‍वर येथे घडली. 

दोन दिवसांनी प्रकाश रामसेवक मंडल या कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीवरुन पळून गेलेल्या चारही आरोपींविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी रॉबरीचा गुन्हा नोंदविला आहे. या चारही आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शोधमोहीम सुरु केली आहे. विशेष म्हणजे मंगळवारी सकाळी याच परिसरात अन्य एका अंगाडियाच्या कार्यालयात रॉबरी झाली होती. 

सुमारे साडेचौदा लाखांच्या दरोड्याची घटना मंगळवारी सायंकाळी पावणेपाच ते पाचच्या सुमारास भुलेश्‍वर येथील कुंभार टुकडा इमारतीमध्ये घडली.   या घटनेनंतर त्याने ही माहिती त्याच्या मालकांना सांगितली होती. गुरुवारी प्रकाश मंडल हा एल. टी मार्ग पोलीस ठाण्यात आला आणि त्याने तिथे उपस्थित पोलिसांना मंगळवारी झालेल्या घटनेची माहिती सांगितली. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध रॉबरीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेचे अधिकारीही करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

20 लाखांचा दरोडा; नोकराचा हात

काळबादेवी येथे एका अंगाडियाच्या कार्यालयात झालेली 20 लाख रुपयांची रॉबरी एका नोकरानेच त्याच्या तीन मित्रांच्या मदतीने घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी रिपन दशरथभाई पटेल या नोकरासह त्याचा मित्र भाविक इंद्रवर्धन पांचाळ या दोघांना एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

अटकेनंतर या दोघांनाही येथील लोकल कोर्टाने मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील दोन मित्र फरार आहेत. अटक आरोपींकडून चोरीस गेेलेली रोख कॅश जप्त करण्यात आली आहे. 
तेजस शेठ हे व्यवसायाने अंगाडिया असून त्यांचे काळबादेवी येथील भुलेश्‍वर, पोकळवाडीतील श्रीजी भवन इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर कार्यालय आहे. मंगळवारी त्यांच्या कार्यालयात तीन तरुण घुसले होते. या तरुणांनी घातक शस्त्रांचा धाक दाखवून सुमारे 20 लाख रुपयांची कॅश पळविली होती. 

याप्रकरणी एल. टी मार्ग पोलिसानी कार्यालयातील चारही कर्मचार्‍यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर रिपन हा दोषी असल्याचे आढळले. घटनेच्या वेळेस आपण बाहेर राहू, त्यावेळेस दोन कर्मचारी कार्यालयात असतील, ही संधी साधून कॅश चोरी करण्याचा सल्ला त्याने दिला होता. त्यानंतर आरोपींनी दरोडा टाकून पळ काढला होता.