Sun, Aug 25, 2019 20:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सुपारी देऊन पत्नीने केली शिवसेना तालुका उपप्रमुखाची हत्या

सुपारी देऊन पत्नीने केली शिवसेना नेत्याची हत्या

Published On: Apr 25 2018 4:32PM | Last Updated: Apr 25 2018 5:15PMठाणे : खास प्रतिनिधी

महिलांशी अनैतिक संबंध, सततची मारहाण, घटस्फोट आणि संपत्तीमधूनही बेदखल होण्याच्या भितीपोटी पत्नीने दीड लाखांची सुपारी देऊन शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश नामदेव निमसे यांची निघृण हत्या घडवून आणल्‍याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने मयत निमसे यांची पत्नी साक्षी निमसे व मारेकरू प्रमोद वामन लुटे (वय 32) या आरोपींना गजाआड केले असून, या प्रकरणातील तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे (वय 43) यांच्या हत्येने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यांचे अर्धवट जळालेले मृतदेह भिवंडी तालुक्यातील देवचोळे गावाच्या हद्दीतील टेकडीवर सापडले होते. याप्रकरणी 20 एप्रिल रोजी गणेशपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. निमसे यांच्या पत्नीने ही हत्या राजकीय वादातू झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्‍यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन, स्थानिक गुन्हे शाखा आणि गणेशपुरी पोलीस स्टेशनची विशेष पथके तयार केली. 

या संवेदनशील गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक विश्‍लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे 24 एप्रिल रोजी प्रमोद वामन लुटे या संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले, आणि धक्कादायक माहिती उघडकीस आली. मयत निमसे यांच्या पत्नीनेच आपल्या ओळखीच्या लोकांना दीड लाखांची सुपारी देऊन पतीची हत्या घडवून आणली. निमसे याचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध होते. त्यातून तो पत्नीला सतत मारहाण आणि लैगिंक शोषण करीत असे. हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहचले होते. त्याने घटस्फोटाच्या पेपरवर जबरदस्तीने सह्याही घेतल्या होत्या. एवढे नव्हे तर तो दुसर्‍या महिलेसोबत कायमचा राहण्यास जाणार होता. घटस्फोट आणि संपत्तीतून बेदखल होण्याची भीतीने अस्वस्थ झालेल्या पत्‍नी साक्षीने अखेर लुटे या ओळखीच्या व्यक्तीला पतीची हत्या करण्यास दीड लाखांची सुपारी दिली. नियोजित कटाप्रमाणे तिला घराच्या दरवाजाची कुंडी उघडी ठेवली आणि आरोपींने त्याची राहत्या घरीच गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह गाडीत घालून भिवंडी तालुक्यातील देवचोळे येथील टेकेडीवर नेला. मयताची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह जाळण्यात आला, मात्र तो अर्धवट जळाला असताना आरोपींनी पोबारा केल्याचे तपासात उघड झाले. विशेष म्हणजे खुनप्रकरणी अटकपूर्व जामिन मिळतो का? याची एका वकिलाकडे केलेली चौकशी ही निमसे याची पत्नी साक्षीला कारागृहापर्यंत पोहचविण्यास कारणीभूत ठरल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

Tags : thane, wife ,murder ,husband, shivsena, taluka ,vice president ,through, contract killer,